मुझफ्फरनगर – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या आम आदमी पक्षाच्या (आप) एका उमेदवाराने बुधवारी अचानकपणे समाजवादी पक्षात (सप) प्रवेश केला. विशेष म्हणजे, मतदानाच्या आदल्या दिवशी ती घडामोड घडली.
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण सात टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी गुरुवारी 58 मतदारसंघांमध्ये मतदान झाले. त्या मतदारसंघांपैकी एक असणाऱ्या चरथावलमध्ये आपने यावर रोशन यांना उमेदवारी दिली. मात्र, रोशन यांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला आपला रामराम ठोकला. एवढेच नव्हे तर, त्यांनी तातडीने सपमध्ये प्रवेश करून त्या पक्षाचे उमेदवार पंकज मलिक यांना पाठिंबा जाहीर केला.
मलिक आणि रोशन एकत्र असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला. त्यानंतर आपने पक्षविरोधी कारवायांचे कारण देऊन रोशन यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.