जोस बटलरने केले हिटमॅनचे कौतुक
लंडन – भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याची फलंदाजी पाहण्यासारखे दुसरे सुख नाही, अशा शब्दात इंग्लंडचा अव्वल फलंदाज जोस बटलर याने रोहितचे कौतुक केले आहे.
रोहितला मी पहिल्यांदा पाहिले तेव्हाच त्याच्या गुणवत्तेची साक्ष मिळाली. हा फलंदाज येत्या काळात खूप मोठा होणार असेही मी भाकीत केले होते. तो फलंदाजी करत असताना फलंदाजी खूप सोपी वाटते. त्याचे फुटवर्क, चेंडू फटकावताना पाय व डोक्याची स्थिती आणि सातत्याने उंचावरुन फटके मारण्याची त्याची गुणवत्ता ही अन्य फलंदाजांमध्ये फारशी दिसत नाही. कोणत्याही खेळपट्टीवर तसेच कोणत्याही वातावरणात आणि कोणत्याही गोलंदाजावर तो वर्चस्व गाजवू शकतो हेच त्याचे मोठेपण आहे. सध्याच्या काळात फलंदाजीचा इतका फ्लो मी पाहिला नाही, असेही बटलरने सांगितले.
रोहितला खेळपट्टीवर जम बसवायला फार वेळ लागत नाही. तो गोलंदाजांना फार संधी देत नाही. सुरूवातीचे काही चेंडू खेळले की त्याला स्विंग किंवा खेळपट्टी गोलंदाजाला किती मदत करत आहे ते इतर फलंदाजांपेक्षा लवकर समजते हेच त्याचे बलस्थान आहे, असेही बटलरने स्पष्ट केले.
कोहलीपेक्षाही प्रेक्षणीय…
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली महान खेळाडू आहे यात शंका नाही. मात्र, रोहित ज्या पद्धतीने फलंदाजी करतो ती कोहलीच्या फलंदाजीच्या शैलीपेक्षाही जास्त प्रेक्षणीय असते. जगातील कोणत्याही मैदानावर कितीही महाग तिकीट काढून मी रोहितची फलंदाजी पाहण्यासाठी जाऊ शकतो, असेही बटलर म्हणाला.