पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या शनिवार दिनांक २१ मार्च पासून ३१ मार्च पर्यंत पुणे शहरातील पेट्रोल पंप आता सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत चालू राहतील, तसेच पुणे शहर बाहेरील पंप सकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत चालू राहतील, असा निर्णय पुणे पेट्रोल डिलर असोसिएशन यांनी घेतला आहे.
दरम्यान, कोरोनामुळे जगभरात थैमान घातलेल्या करोना विषाणूचा संसर्ग हा भारतात सुद्धा झाला आहे. विशेष करून महाराष्ट्रात आणि ते ही पुण्यात करोनाचे संशयित रुग्ण अधिक आहेत. हा आकडा सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये बंद केली आहेत त्यापाठोपाठ अनेक खासगी कंपन्यांना सुट्टया दिल्या आहेत तर काही खासगी कंपन्यांनी आपल्या कामगारांना घरूनच काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सिनेमागृह मॉल सुद्धा बंद ठेवण्यात आली आहेत. व्यापारी असोसिएशनने शहरातील दुकाने बंद ठेवली आहेत. मोठी मोठी हॉटेल बंद आहेत.