पुणे – सुरूवातीला मद्याचे व्यसन, त्यामुळे इंजिनिअर पतीची गेलेली नोकरी, कौटुंबिक वाद आणि त्याचे विवाहबाह्य संबंधामुळे पत्नीने क्रुरतेच्या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला. तो न्यायालयात हजर झाला. त्यावेळी “मी वकील, पोटगी काहीही देऊ शकत नाही’ असे सांगितले. त्यावेळी पत्नीनेही काहीही अपेक्षा नसून, केवळ घटस्फोट हवा असल्याचे सांगितले. न्यायालयाच्या सूचनेनुसार क्रुरतेचा दावा परस्पर संमतीने दाखल करण्यात आला. एका दिवसात निकाली निघाला. कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश एस. व्ही. फूलबांधे यांनी हा निकाल दिला.
या दाव्यातील पती इंजिनिअर, तर पत्नी गृहिणी आहे. नोकरी गेल्यानंतर पती काहीही काम-व्यवसाय करत नव्हता. त्यांच्यात कौटुंबिक कारणातून सातत्याने वाद होत. त्याचे विवाहबाह्य संबंध पत्नीला समजले होते, असे दाव्यात नमूद आहे. पत्नीने क्रुरतेच्या आधारावर येथील कौटुंबिक न्यायालयात ऍड. अफरोजअली शेख, ऍड. इब्राहिम शेख यांच्यामार्फत दावा दाखल केला होता. त्यांना ऍड. प्रियांका कदम, ऍड. हर्षदा ताईवडे आणि ऍड. स्वालेहा शेख यांनी मदत केली.
माधव आणि माधवी (नावे बदललेली आहेत) त्यांचा मुलगा कायमस्वरुपी पत्नीकडे राहणार असून त्यास पतीची काहीही हरकत नाही, असे ठरले. पैसे नसल्याने पोटगी देऊ शकत नाही, असे पतीने स्पष्ट केले होते. वकिलांच्या सहभागाशिवाय आम्ही देखील त्वरित निकाल देऊ शकत नाही. कारण पक्षकार हे वकिलांच्या सल्ल्याशिवाय तडजोड करण्यास तयार होत नाहीत, असे मत न्यायालयाने नोंदवले. त्यानुसार पत्नीचे वकील त्याच्यातर्फे हजर राहिले.
पती-पत्नी एक वर्षांहून अधिक काळ विभक्त राहत होते. नोटीस बजावल्यावर तो न्यायालयात हजर राहिला. घटस्फोट घेण्याबाबत दोघांचे एकमत झाले. न्यायाधीशांनी दोन्ही पक्षांची बाजू ऐकत तत्परतेने निकाल दिला. त्यामुळे पक्षकारांना न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागल्या नाहीत. वेळेबरोबर पैसे आणि होणाऱ्या मानसिक त्रासातून पक्षकारांची मुक्तता झाली.
– ऍड. अफरोजअली शेख, अर्जदाराचे वकील.