पुणे – “न्याय आपल्या दारी’ संकल्पनेची पक्षकारास रविवारी (दि. 30) झालेल्या लोकअदालतमध्ये प्रचिती आली. अपघातामुळे अपंगत्व आलेल्या पक्षकारांना भेटण्यासाठी न्यायाधीश कोर्ट हॉल सोडून दुसऱ्या मजल्यावरून खाली तळमजल्यावर आले. त्या महिला पक्षकाराची विचारपूस करून त्यांचे समक्ष तडजोडनावर सहया आणि अंगठे घेतले. तडजोडीच्या रक्कमेचा धनादेश त्या पक्षकारांकडे सुपुर्द करण्यात आला. त्यांना 47 लाख 90 हजार रुपये मिळणार आहेत. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस.आर.नावंदर आणि ऍड. अतुल गुंजाळ यांच्या पॅनेलने हा दावा निकाली काढला.
नयना गणेश बोरा (रा. शिरूर) असे पक्षकारांचे नाव आहे. त्यांनी ऍड. शशिकांत बागमार आणि ऍड. निनाद बागमार यांचेमार्फत येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे नुकसान भरपाई मिळावी, यासाठी दावा दाखल केला होता. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात हा दावा दाखल करण्यात आला होता. नयना या स्कुटीवरून 28 ऑक्टोबर 2019 मध्ये निघाल्या होत्या. त्यावेळी समोरून भरधाव वेगात आलेल्या कारने स्कुटीला धडक दिली.
त्यांनी गंभीर मार लागला. डाव्या बाजूच्या कवटीचा चुरा झाला. त्यांना 100 टक्के अपंगत्व आले. त्यांना कोलंबिया हॉस्पिटल, खराडी येथे ऍडमिट केले होते. त्यानंतर दावा दाखल करण्यात आला होता. हा निकाली निघाला. विमा कंपनीचे वतीने ऍड. सत्यजित लोणकर यांनी काम पाहिले. यासाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक आणि मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे प्रमुख सदस्य न्यायाधीश बी.पी.क्षीरसागर यांचे सहकार्य लाभले.
अपघातात अपंगत्व आलेला पक्षकाराला कमी कालावधीत न्याय मिळवून दिल्याचा आनंद वाटत आहे. न्यायाधीशांनी दुसऱ्या मजल्यावरून खाली येऊन दावा निकाली काढण्यासाठी तत्परता दाखवली. त्यामुळे “न्याय आपल्या दारी’ संकल्पनेची प्रचिती आली.
ऍड. निनाद बागमार, पक्षकार महिलेचे वकील.