पुणे – पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक एकने आंतरराज्यीय ड्रग तस्करांकडून दोन कोटी 21 लाख 60 हजार रुपयांचा मेफेडॉन (एम.डी.) हा अमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी तीघांना अटक करण्यात आली असून, ते तिघेही मध्य प्रदेशातील आहेत. यातील एक जण अल्पवयीन आहे. मागील काही वर्षांत झालेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे.
दीड वर्षापूर्वी सहा नायजेरियन व्यक्तींकडून 200 ग्रॅम कोकेण आणि 100 ग्रॅम मेफेडॉन जप्त केले होते. तर डिसेंबर 2022 मध्ये तीन नायजेरियन व्यक्तींकडून एक किलो कोकेण जप्त केले होते.
आझाद शेरजमान खान (वय 35) नागेश्वर रामेश्वर प्रजापती (वय 35) व एक विधी संघर्षग्रस्त बालक अशी अटक आरोपींची नावे आहेत.
उपायुक्त(गुन्हे) अमोल झेंडे यांनी सांगितले की, पोलीस आयुक्त रितेश कुमार व सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरामध्ये अमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याकरीता विशेष मोहीम राबविण्याची सूचना दिली होती. त्यानुसार पथक एक चंदननगर परिसरात गस्त घालत असताना अंमलदार मनोजकुमार साळुंके व मारुती पारधी यांना खबर मिळाली की, मध्य प्रदेशातील काही व्यक्ती खराडी चौकातून रक्षकनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मेफेड्रॉनची विक्री करण्यासाठी येणार आहेत.
त्यानुसार सापळा रचून आरोपींना पकडण्यात आले. त्यांच्याकडे एक किलो 108 ग्रॅम मेफेड्रॉन सापडले. त्याची किंमत 2 कोटी 21 लाख 60 हजार रुपये आहे. त्यांच्याविरुध्द चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, पांडुरंग पवार, विशाल दळवी, राहुल जोशी, विशाल शिंदे, योगेश मोहिते व संदेश काकडे यांनी केली आहे
आरोपी मजूर
अल्पवयीन मुलासह तिघेही मुळचे मध्य प्रदेशातील एकाच गावचे आहेत. यातील एक आरोपी महिनाभरापूर्वीच शहरात राहायला आला होता. तो येथे मोलमजुरीचे काम करत होता. मेफेड्रॉन मध्य प्रदेशातून आणल्याचे ते सांगत आहेत. ते येथे कोणाला देण्यात येणार होते, तसेच या बदल्यात किती पैसे मिळणार होते, याचा तपास करण्यात येत आहे. आजवर मेफेड्रॉन हा अमली पदार्थ राजस्थान आणि मुंबईमार्गे आल्याचे निदर्शनास आले होते. मध्य प्रदेशातून प्रथमच पुण्यात हा पदार्थ आला आहे.
चार महिन्यांत दीड कोटींचे पदार्थ जप्त
अमली पदार्थ विरोधी पथकाने जानेवारीपासून आजवर 1 कोटी 65 लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. यामध्ये कोकेण, गांजा, अफू, मेफेड्रॉन आणि कॅथा एड्यूलिस वनस्पतीचा समावेश आहे. आजवरच्या कारवाईत मुख्य आरोपी आणि खरेदीदारांपर्यंत एखाद्या दुसऱ्या गुन्ह्यात पोलिसांना पोहचता आले आहे. अन्यथा पेडलरच हाती लागत आहेत. अमली पदार्थ तस्करांचे नेटवर्क स्ट्रॉंग असल्याने मुख्य आरोपी नामानिराळे रहातात.