घाऊक बाजारात मंगळवारी 430 गाड्यांमधून भाजीपाल्याची आवक
पुणे – गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात भाजीपाल्याची नियमित आवक सुरू झाली असून घाऊक बाजारात मंगळवारी 430 गाड्यांमधून भाजीपाल्याची आवक झाली. मांजरी, मोशी तसेच खडकीतील उपबाजारातही मोठी आवक झाली.
करोनाला अटकाव घालण्यासाठी बाजार समितीकडून मार्केट यार्डात उपाययोजना करण्यात आल्या आहेत. बाजारातील गर्दी टाळण्यासाठी दिवसाआड भाजीपाला आणि कांदा-बटाटा तसेच फळ विभागाचे कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारी बाजारात फळे आणि कांदा, बटाट्याच्या गाड्यांची आवक सुरू झाली. त्यात 122 गाड्या कांदा-बटाट्याच्या होत्या.
मंगळवारी पहाटे बाजाराचे कामकाज सुरू झाल्यानंतर बाजारात टप्याटप्याने आडते, मुख्य खरेदीदारांना प्रवेश देण्यात आला. मंगळवारी मार्केट यार्डातील बाजारात भाजीपाल्याच्या 430 गाड्या दाखल झाल्या. बाजार समितीचे 400 कर्मचारी कामकाजाची पाहणी करत होते. दुपारी बारा वाजेपर्यंत बाजारातील सर्व व्यवहार पार पडले. खडकी, मोशी येथील बाजारातही मंगळवारी आवक झाली, असे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले.
बाजारात टप्प्याटप्प्याने खरेदीदार, आडत्यांना प्रवेश देण्यात येत आहे. बाजारात पट्टे आखून दिले आहेत. मास्क घालून सर्व व्यवहार तसेच पुरेशी सुरक्षा बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आडते, खरेदीदार, टेम्पोचालक यांना ओळखपत्र दिले आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शहरात भाजीपाला, फळे तसेच भुसारमालाचा तुटवडा नाही. नागरिकांनी भीतीपोटी साठवणूक करू नये, असे आवाहन त्यांनी केले. मोशी येथील उपबाजारात 110 गाड्यांमधून भाजीपाल्याची आवक झाली. मांजरी येथील उपबाजारात 132 गाड्या तसेच खडकी येथील उपबाजारात 20 गाड्यांमधून भाजीपाल्याची आवक झाली. मार्केट यार्ड, मांजरी, मोशी, खडकी येथील बाजारात एकूण मिळून 692 गाड्या भाजीपाला विक्रीसाठी पाठवला. मुख्य तसेच उपबाजारात एकूण मिळून 19 हजार 990 क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली, अशी माहिती बाजार समितीकडून देण्यात आली.