पुणे – सिंहगडावर पर्यटनासाठी आलेल्या जोडप्याने दुचकीवरून परतताना गूगल मॅपद्वारे मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकी थेट महामार्गावर आल्याने मार्ग चुकला. यामुळे महामार्गावर वळण घेत असतानाच ट्रकचे धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला. तर तरुणाला दुखापत झाली.
रिदा इम्तीयाज मुकादम (23, रा. खराडी) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तीचा मीत्र नटराज अनिलकुमार (30, रा. वानवडी) याने तक्रार दिली आहे. यावरून ट्रक चालकावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, नटराज आणि रिदा खराडी येते एकाच कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करतात. ते दोघे रविवारी सिंहगडावर फिरायला गेले होते. तेथून त्यांना पुन्हा वानडीला जायचे होते. यासाठी त्यांनी गूगल मॅप लावला होता. गूगल मॅपने दाखवलेल्या मार्गानूसार ते थेट नवीन कात्रज बोगद्याकडे आले.
बोगद्यापाशी आल्यावर त्यांना मार्ग चुकल्याचे लक्षात आले. यामुळे नटराज बोगद्याच्या अलीकडून वळून माघारी फिरत असताना त्यांना एका ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये रिदा ट्रकखाली सापडून तीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात करत आहेत.
ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार –
जोत्स्ना सूर्यकांत वाघुले (40 , रा. दिघी) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवासी महिलेचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार सूर्यकांत वाघुले (46 ) जखमी झाले आहेत. या प्रकरणी पसार झालेल्या ट्रकचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूर्यकांत यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार सूर्यकांत आणि त्यांची पत्नी ज्योत्स्ना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन निघाले होते. वडगाव उड्डाणपुलाजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या ज्योत्स्ना यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.