पिंपरी (प्रतिनिधी) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तीन, भारतीय जनता पक्षाच्या 1, आरपीआयच्या 1 यांच्यासह 12 अपक्ष अशा 20 इच्छुकांनी मंगळवार (दि.31) रोजी 34 अर्ज नेले आहेत. पहिल्याच दिवशी अर्ज घेऊन जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने या निवडणुकीत उमेदवारांची संख्या मोठी राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मंगळवारी एकाही इच्छुक उमेदवाराने अर्ज भरला नाही.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक
पहिल्याच दिवशी 20 जणांनी 34 अर्ज नेले
राष्ट्रवादीच्या 3, भाजप 1 आणि 12 अपक्षांचा समावेश
205 चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी अधिसूचना प्रसिद्ध झाली. 31 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2023 या कालावधीत नामनिर्देशन पत्र थेरगाव येथील ग क्षेत्रीय अधिकारी कार्यालयात दाखल करता येणार आहेत. मंगळवारी पहिल्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून नामनिर्देशन पत्र नेले आहेत.
नामनिर्देशन पत्र नेताना नोंदवहीमध्ये संबंधितांची प्राथमिक माहिती नोंदवली जात आहे. यामध्ये दिनांक व वेळेसह नामनिर्देशन पत्र नेणाऱ्या उमेदवाराचे नाव, पत्ता, नामनिर्देशन पत्रांची संख्या, राजकीय पक्षाचे संपूर्ण नाव, उमेदवाराचा प्रवर्ग, भ्रमणध्वनी क्रमांक, ईमेल आयडी, नामनिर्देशन पत्र ताब्यात घेणाऱ्याचे नाव, आदी बाबींची नोंद केली जात आहे. तसेच नामनिर्देशन पत्राची प्रत, आचारसंहिता पुस्तिकेची प्रत दिली जात आहे.
अर्ज घेऊन जाणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका माया बारणे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, संभाजी बारणे, भाजपच्या बायडाबाई काटे यांच्यासह 20 जणांनी अर्ज नेले आहेत. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले म्हणाले, पहिल्या दिवशी 20 नागरिकांनी 34 अर्ज नेले आहेत. मात्र, एकाही उमेदवाराने अर्ज भरला नाही.