शेवगाव – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ऍड. प्रताप ढाकणे यांनी शेवगाव मतदारसंघात जनसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे. मतदारसंघातील शेवगाव व पाथर्डी या दोन्ही तालुक्यांत पक्ष संघटना मजबूत करणे हे या यात्रेचे उद्दिष्ट असले, तरी ही जनसंवाद यात्रा मोठ्या स्वरूपात विसंवादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे जाणवत आहे.
पक्षाचे प्रांतिकचे नेते असलेल्या ऍड. प्रताप ढाकणे यांच्या येथील संवाद यात्रेकडे शेवगाव तालुक्यातील पदाधिकारी व नेत्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. त्यावरून हे स्पष्ट होते. आगामी काळात सन 2024च्या विधानसभा निवडणुकीची दावेदारी या मागचे कारण असू शकते.
मागील 2019मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी पक्षाने ऍड. ढाकणे यांना उमेदवारी देऊन संधी दिली होती. थोड्याशा फरकाने त्यांच्या यशाने त्यांना हुलकावणी दिली. त्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या परवानगीने किंवा त्यांनी दिलेल्या संकेतानुसारच शेवगाव मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढून 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी आपला दावा ते करत आहेत.
ही गोष्ट शेवगाव तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना, विशेषतः घुले समर्थकांना रुचली नसावी, म्हणूनच अनेक घुलेसमर्थक याबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त करत आहेत. ऍड. ढाकणे यांच्या संवाद यात्रेनंतर घुलेंचाही स्वतंत्र दौरा निघू शकतो, तशा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हालचालीदेखील सुरू आहेत.
शेवगाव मतदारसंघाचे आमदार भाजपचे असले, तरी तालुक्यातील बहुतांशी सहकारी संस्था व ग्रामपंचायती घुले बंधूचे नेतृत्व मानणाऱ्या आहेत. त्यामुळे परिसरात राष्ट्रवादीचे कोणतेही कार्यक्रम घुलेंना डावलून यशस्वी होऊ शकणार नाहीत. या समीकरणाचे ढाकणेंना इतक्या वर्षे घुलेंसोबत राहूनदेखील आकलन झाले नाही, असे म्हणता येणार नाही. म्हणूनच यामागचे वेगळे इंगित असू शकते.
वरिष्ठांचा आदेश की इतिहासाचा मनसुबा!
मतदारसंघातील शेवगाव व पाथर्डी या दोन्ही तालुक्यांत पक्ष संघटना मजबूत करणे हे या यात्रेचे उद्दिष्ट असले, तरी या संदर्भात प्रदेश पातळीवरून स्थानिक नेतृत्वाला बाजूला ठेवण्याचा सल्ला दिला गेलाय की तालुक्यातील दुसरी एखादी “शक्ती’ सोबतीला घेऊन ऍड. ढाकणे यांचा नवा इतिहास घडवायचा मनसुबा आहे, असा संशय घेतला तर ते वावगे ठरू नये.