अमरावती – कॉंग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर टीका करताना खासदार अनिल बोंडे यांची जीभ घसरली. इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमती ठाकूर यांना ठाकुरांची पदवी मिळाली, असे बोंडे यांनी म्हटले आहे. तसेच यांचा डीएनए हा इंग्रजांची चाकरी करणाऱ्यांचा आहे, असे म्हणत त्यांनी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले आहे.
बोंडे म्हणाले की, कॉंग्रेसचा डीएनए महात्मा गांधीचा नाही तर तो फिरोज जहांगीर गांधींचा आहे. भाजपचा डीएनए हा भारताचा आहे. भाजपची ओबीसी यात्रा अमरावती जिल्ह्यामध्ये यशोमती ठाकूर यांच्या मतदारसंघ तिवसा येथे आली होती. त्यावेळी कार्यक्रमात बोलताना बोंडे यांनी हे वक्तव्य केले आहे.
यशोमती ठाकूर यांनी अनिल बोंडेंना थेट भाटांकडील इतिहास दाखवून प्रतिउत्तर दिले आहे. 1700 साली सव्वा तोळ्याची एक अशा सव्वा लाख सोन्याच्या गिन्या या गोरगरीबांना दान केल्या म्हणून यशोमती ठाकुरांच्या कुटुंबाला ठाकुर ही पदवी दिल्याचा दावा यशोमती ठाकूर यांच्या घरी आलेल्या भाटांनी केला आहे.
दुष्काळात आमच्या पूर्वजांनी दान केले त्यांच्या नोंदी आहेत. माझ्या पूर्वजांनी गरीबांना मदत केली हा इतिहास आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे दंगली झाल्या आहे. खासदार म्हणून त्यांना जे मूळ काम त्यांना करायचे आहेत ते करत नाही. ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने राज्यात ओबीसी जागर यात्रा सुरु आहे. सोमवारी ही यात्रा अमरावतीमध्ये होती. यानिमित्ताने अमरावती शहर परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले होते. दरम्यान या यात्रेवरून यशोमती ठाकूर यांनी भाजपला टोला लगावला होता. निवडणुका आल्या की भाजपला असे धंदे सुचतात, अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता.