नागपूर – खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस यांच्या फेव्हिकॉलच्या जोडीत नाक खुपसू नये. अन्यथा नाकपुड्या बंद होऊन गुदमरुन मराल, असा इशारा वजा टोला भाजपचे राज्यसभेतील सदस्य अनिल बोंडे यांनी शुक्रवारी ठाकरे गटाला दिला.
युती सरकारमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघरच्या सभेत स्पष्ट केले. पण राऊतांनी ही सभा चांगली ऐकली नसेल, असेही ते म्हणाले.
राज्यातील सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीत सध्या शिवसेनेच्या एका जाहिरातीवरून मतभेद निर्माण झाल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पालघरमधील एका कार्यक्रमात सरकारमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले. “देवेंद्रजी आणि माझी दोस्ती जीवाभावाची आहे. आमची मैत्री म्हणजे फेव्हिकॉलची जोडी असून ती कधीच तुटणार नाही’, असेही त्यांनी यावेळी म्हटले होते.
काय म्हणाले होते संजय राऊत
शिंदेंच्या दाव्यावर खासदार संजय राऊत यांनी हरकत नोंदवली. पालघरच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकमेकांकडे पाहायलाही तयार नव्हते. त्यामुळे कसला फेव्हिकॉलचा जोड, न कसले काय? ही युती येत्या 2 महिन्यांत तुटेल, असा टोला राऊत यांनी लगावला. यावरून भाजप खासदार अनिल बोंडे यांनी राऊतांवर पलटवार केला आहे.