Nushrratt Bharuccha – इस्रायलवर (Israel) हमासने जेंव्हा दहशतवादी हल्ला केला होता, तेंव्हा बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) इस्रायलमध्येच होती. तेथील भयानक अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आपल्याला अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये भारतात परत आणण्यासाठी सरकारने जी सुविधा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल तिने सरकारचे आभारही मानले आहेत.
“दोन दिवसांपूर्वी हॉटेलच्या रुममध्ये बॉम्बच्या आवाजांनीच मला जाग आली. त्याचवेळी सायरन देखील वाजू लागले होते. आम्हाला तातडीने खाली तळघरामध्ये नेण्यात आले. अशा परिस्थितीला मी आतापर्यंत कधीच सामोरी गेलेली नव्हते.
त्यामुळे खूप भीती वाटली. मात्र आज मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये असताना जी सुरक्षितता वाटते आहे, ती तेथे जाणवली नाही.’ असे नुसरतने आपल्या व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.
भारतीय आणि इस्रायली दूतावासाने आपल्याला जे मार्गदर्शन केले, त्याबद्दल तिने सर्वांचे आभार मानले आहेत. जे लोक तेथे अडकून पडले आहेत, त्यांच्याविषयी चिंता व्यक्त करून तिने त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना देखील केली.
शेवटचा आठवडा माझ्या स्मरणात कायमचा कोरला जाईल… भावनांचा रोलरकोस्टर राईड, त्यातील शेवटचे 36 तास माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय आणि भयावह असतील, असे तिने म्हटले आहे.