Maharashtra Lok Sabha Election 1st Phase: निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर लोकशाहीच्या महापर्वाला सुरुवात झाली आहे. देशभरात लोकसभेच्या निवडणुका एकूण 7 टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यातील जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 27 मार्चपर्यंत आहे. महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात निवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्यातील विदर्भाच्या पाच मतदारसंघांत मतदान पार पडणार आहे. यामध्ये पूर्व विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील सर्व मतदरासंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज 27 मार्च शेवटची तारीख होती. त्यानुसार महाविकास आघाडीसह महायुतीतील तसेच इतर उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. 28 मार्चला या अर्जाची छाननी केली जाईल आणि वैध ठरलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 30 मार्चपर्यंत मुदत आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ –
चंद्रपूरमध्ये भाजपचे मंत्री आणि फायरब्रँड नेते सुधीर मुनगंटीवार यांचे वर्चस्व पणाला लागले आहे. आमदार, पालकमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, कॅबिनेट मंत्री अशी पदे त्यांनी भूषविले आहेत. यंदा ते खासदारकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत. त्यांच्या विरोधात दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर रिंगणात आहेत. सामाजिक कार्यातून त्यांनी आपला प्रवास सुरू केला. बाळू धानोरकर यांच्या प्रचारात स्वतःला झोकून दिले. तिथेच त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. त्या आमदारही राहिल्या आहेत. महिला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. वंचित घटकांसाठी त्या कार्यरत असतात. तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात येता यावे म्हणून त्यांना नोकऱ्यात आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली होती. कोरोना काळातही त्यांनी चांगले काम केले. विशेष म्हणजे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी महाराष्ट्रात शक्ती कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी पहिली मागणी त्यांनी केली होती.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदरासंघांचा समावेश आहे. यात चंद्रपूरमधील राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि आर्णी या मतदारसंघांचा समावेश आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 36 हजार 31 मतदार यंदा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारसंघात बाळू धानोरकर 2019 मध्ये निवडणून आले होते. परंतु त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त आहे.
लोकसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत धानोरकर यांनी भाजपचे हंसराज अहीर यांचा पराभव केला होता. सुरेश धानोरकर यांना 5,59,507 मते पडली होती. तर हंसराज अहीर यांना 5,14,744 मतांवर समाधान मानावे लागले होते. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी राजेंद्र महाडोळे यांना उमेदवारी दिली होती. त्यांना 1,12,079 मते पडली होती. यंदा या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर अशी थेट लढत होणार आहे.
गडचिरोली लोकसभा मतदारसंघ –
गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून भाजपकडून अशोक नेते रिंगणात आहेत. तर काँग्रेसकडून डॉ. नामदेव किरसान यांनी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने हितेश पांडुरंग मडावी यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत गडचिरोली-चिमूर मतदार संघातून भाजपचे अशोक नेते विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसच्या डॉ. नामदेव उसेंडी यांचा पराभव केला. अशोक नेते यांना 5,19,968 मते पडली होती, तर डॉ. नामदेव उसेंडी यांना 4,42,442 मते पडली. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. रमेशकुमार गजबे यांनी 1,11,468 मते मिळवली होती. ही मते काँग्रेसच्या उसेंडी यांना मिळाली असती, तर चित्र वेगळे राहिले असते.
गडचिरोली लोकसभा मतदारसंघात देखील 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यात गडचिरोलीतील आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी हे तीन आणि चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी, चिमूर हे दोन आणि गोंदिया जिल्ह्यातील आमगाव विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. गडचिरोली लोकसभा मतदारसंघात 14 लाख 13 हजार 96 मतदार यंदा मतदानासाठी सज्ज आहेत.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ –
भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपने सुनील मेंढे, तर काँग्रेसने डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने संजय गजानन केवट यांना रिंगणात उतरवले आहे. विशेष म्हणजे लोकसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदार संघातून सुनील मेंढे विजयी झाले होते. ते आपली जागा राखणार का, हे पाहावे लागेल. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना पंचबुद्धे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत सुनील मेंढे यांना 6,50,243 मते पडली होती. तर नाना पंचबुद्धे यांना 4,52,849 मते पडली. या ठिकाणी बहुजन समाज पक्षाने डॉ. विजया राजेश नंदुरकर यांना उमेदवारी दिली होती. त्यांना 52,659 मते पडली होती. यंदा या ठिकाणची लढत रंगतदार होणार आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यात भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा व साकोली, तर गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, तिरोडा आणि गोंदिया या मतदारसंघांचा समावेश आहे. हा मतदारसंघ 2008 साली निर्माण करण्यात आला.
नागपूर लोकसभा मतदारसंघ –
नागपूर मतदार संघात पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. याठिकाणी भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध काॅंग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात सामना रंगणार आहे. गडकरींना संपूर्ण महाराष्ट्र तर ओळखतोच, पण देशभर त्यांनी आपल्या कर्तृत्वाने छाप पाडली आहे. महाराष्ट्रात 1995 ते 1999 या काळात भाजप-शिवसेना युतीच्या काळात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद भूषविले. या काळात त्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान 55 उड्डाणपूल बांधले. आमदार, खासदार, भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा चढता प्रवास राहिला. त्यांच्याविरोधात विकास ठाकरे रिंगणात आहेत. त्यांनी नागपूर पश्चिमचे आमदारपद भूषविले आहे. सोबत महापौरपद आणि शहर काँग्रेसचे ते अध्यक्षही होते. माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेस नेते विलासराव मुत्तेमवार यांचे ते कट्टर समर्थक आहेत. मुत्तेमवार यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सूत्रे त्यांनी हाताळली होती. यंदा आता तेच प्रत्यक्षात रिंगणात आहेत.
2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत येथे भाजपचे गडकरी विजयी झाले होते. त्यांनी या ठिकाणी काँग्रेसचे नाना पटोले यांचा पराभव केला होता. नितीन गडकरी यांनी 6,60,221 मते पडली होती. तर नाना पटोले यांना 4,44,212 मतांवर समाधान मानावे लागले. या ठिकाणी बहुजन समाज पक्षाकडून मोहम्मद जमाल रिंगणात होते. मात्र, त्यांना फक्त 31,725 पडले. यंदाही या जागेवर भाजपकडून नितीन गडकरी, काँग्रेसकडून विकास ठाकरे आणि दीपक निकाळजे यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाकडून रेखा गोगले रिंगणात आहेत. मात्र, खरी लढत गडकरी विरुद्ध ठाकरे अशीच रंगणार आहे.
नागपूर लोकसभा मतदारसंघ हा 6 विधानसभा मतदारसांनी मिळून बनलेला आहे. यात नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघ –
रामटेक मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राजू पारवे रिंगणात आहेत. त्यांनी काही दिवसांपू्र्वीच काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे आव्हान आहे. लोकसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत रामटेक मतदार संघातून शिवसेनेचे कृपाल तुमाने विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसच्या किशोर गजभिये यांचा पराभव केला होता. कृपाल तुमाने यांना 5,97,126 मते पडली होती. तर किशोर गजभिये यांना 4,70,343 मते पडली. बहुजन समाज पक्षाने या ठिकाणी सुभाष गजभिये यांना उमेदवारी दिली होती. त्यांना 44,327 मते पडली होती. यंदा शिवसेनेत आलेले पारवे पूर्वाश्रमीचे काँग्रेसी आहेत. त्यामुळे त्यांचा सामना जुन्या सहकाऱ्यांशीच होणार आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघ देखील 6 विधानसभा मतदारसंघांनी मिळून बनलेला आहे. यात काटोल, सावनेर, हिंगणा , उमरेड, कामठी आणि रामटेक या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. याठिकाणी शिवसेनेचे (शिंदे गट) कृपाल तुमाने हे विद्यमान खासदार आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.