लोणी काळभोर – येथील भोसलेनगर परिसरात घरासमोर चुलत्याच्या वाढदिवसाचा केक कापणाऱ्या अल्पवयीन मुलांना पोलीस उपनिरीक्षक व सहकारी पोलीसांनी काठीने बेदम मारहाण व महिलांना शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला. या संदर्भात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेचे शाखाप्रमुख संतोष भोसले यांनी केली आहे.
शिवसेना (ठाकरे गटाचे) शाखाप्रमुख संतोष भोसले यांचा काल वाढदिवस होता. रात्री साडेनऊ वाजता घरातील व परिसरातील अल्पवयीन मुले व महिला केक कापण्यासाठी भोसले यांच्या घरासमोर जमले होते. यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वैभव मोरे व त्यांचे सहकारी एका खासगी गाडीतून त्या ठिकाणी आले.
काहीही न बोलता त्यांनी सरळ काठीने मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी काही महिलांनी लहान मुलांना पोलिसांनी मारहाण करु नये म्हणून अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी पोलिसांनी महिलांना शिवीगाळ केली. संतोष भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पंधरा मिनिटांच्या गोंधळानंतर पोलीस तेथून निघून गेले.
आज दिवसभरात पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या बरोबर संबंधितांचे बैठकांचे सत्र सुरू होते. संतोष भोसले व त्यांचे सहकारी वैभव मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीवर ठाम आहेत.
मध्यरात्रीपर्यंत ठिय्या आंदोलन
संतोष भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी पन्नास महिलांसह लोणी काळभोर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून मध्यरात्री बारा वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले; मात्र यावेळी एकही अधिकारी पोलीस ठाण्यात हजर नव्हते. यावेळी शिवसेनेचे हवेली तालुका अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रमेश भोसले यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते, महिला व नागरीक मोठ्या संख्येने हजर होते. यावेळी तक्रार अर्ज देऊन कार्यकर्ते निघून गेले.
वैभव मोरे यांच्याबाबात पूर्वीही तक्रारी
पोलीस उपनिरिक्षक वैभव मोरे यांच्या संदर्भात यापूर्वी ही बऱ्याच तक्रारी आल्या आहेत. शिवजयंती व छत्रपती संभाजी महाराज जयंती मिरवणूक, दहीहंडीच्या कार्यक्रमात त्यांनी तरुण मुलांना मारहाण केल्याचा आरोप कार्यकर्ते आता करत आहेत. इतर बऱ्याच ठिकाणी त्यांनी कायद्याची चौकट मोडून काम केले आहे असा आरोप होत आहे.