गुवाहाटी – सलामीवीर जोस बटलर-यशस्वी जैस्वाल यांची धडाकेबाज अर्धशतके आणि नंतर युजवेंद्र चहल-ट्रेंट बोल्ट यांनी घेतलेल्या प्रत्येकी तीन बळींच्या जोरावर राजस्थानने दिल्ली कॅपिटल्सवर 57 धावांनी “रॉयल’ विजय मिळवला.
राजस्थानने ठेवलेल्या 200 धावांचा पाठलाग करताना दिल्लीला निर्धारित षटकांत 9 बाद 142 धावांपर्यंतच मजल मारता आली. अशा प्रकारे राजस्थानने यंदाच्या आयपीएल हंगामातील दुसरा विजय साजरा केला. तर दिल्लीचा हा सलग तिसरा पराभव ठरला. दिल्लीकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 55 चेंडूत 65 धावांची खेळी करताना दिलेली एकतर्फी झुंजही व्यर्थ ठरली.
त्याला ललित यादवने 24 चेंडूत 38 धावा करून चांगली साथ दिली. वॉर्नर-यादव व्यतिरिक्त अन्य कुठलाही फलंदाज बोल्ट-चहलसमोर टिकू शकला नाही. राजस्थानकडून बोल्ट-चहल यांच्यासह रविचंद्रन अश्विनने 2 तर संदीप शर्माने 1 विकेट घेत दिल्लीच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.
तत्पूर्वी, आयपीएलच्या या 11 व्या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून राजस्थानला फलंदाजीस आमंत्रित केले. राजस्थानकडून केवळ तीनच फलंदाजांनी दुहेरी आकडा पार करताना संघाला मजबूत धावसंख्या उभारून दिली. राजस्थानकडून जोस बटलरने 79, यशस्वी जैस्वालने 60 तर हेटमायरने 39 धावांची तुफानी खेळी खेळली. तर दिल्लीकडून मुकेश कुमारने 2 बळी फलंदाज बाद केले.
पहिल्याच षटकात 4, 4, 4, 0, 4, 4.
राजस्थानसाठी सलामीला उतरलेल्या यशस्वी जैस्वालने फलंदाजीने अप्रतिम खेळ दाखवला. त्याने दिल्लीकडून पहिले षटक टाकायला आलेल्या खलील अहमदला 5 चौकार मारले आणि अवघ्या 6 चेंडूत 20 धावा केल्या. पहिल्या तीन चेंडूंवर यशस्वीने चेंडू सीमारेषेच्या पार केला. यानंतर, त्याने चौथा निर्धाव राहिल्यानंतर त्याने पाचव्या आणि सहाव्या चेंडूवरही चौकार ठोकला. सुरुवात धडाकेबाज केल्यानंतर जैस्वालने आकर्षक फटकेबाजी करताना अवघ्या 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अखेरीस त्याने 31 चेंडूत 60 धावा केल्या ज्यात 11 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स ः 20 षटकांत 4 बाद 199 (यशस्वी जैस्वाल 61-31 चेंडू, जोस बटलर 79-51 चेंडू,शिमरॉन हेटमायर 39-21 चेंडू; मुकेश कुमार 2-36, रोव्हमन पॉवेल 1-18, कुलदीप यादव 1-31) विजयी वि.
दिल्ली कॅपिटल्स ः 20 षटकांत 9 बाद 142 (डेव्हिड वॉर्नर 65-55 चेंडू, ललित यादव 38; युजवेंद्र चहल 3-27, ट्रेंट बोल्ट 3-29, आर अश्विन 2-25, संदीप शर्मा 1-20).