मुंबई – आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहिलेले महाराष्ट्राचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने अधोगती पुस्तकाच्या माध्यमातून जाताजाता चिमटा काढला. कोश्यारींचा शुक्रवारी राजभवनात अखेरचा दिवस होता. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात जात भगतसिंह कोश्यारींची भेट घेत त्यांना निरोप दिला. मात्र, जाता जाता राष्ट्रवादी कॉंग्रेसने खोचक पद्धतीने भगतसिंह कोश्यारींवर निशाणा साधला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या प्रगतिपुस्तकाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने कोश्यारी यांचे अधोगती पुस्तक काढले. हे अधोगती पुस्तक राष्ट्रवादीने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून पोस्ट केले होते.
या अधोगती पुस्तकात विद्यार्थ्याचे नाव हे भगतसिंह कोश्यारी, असे देण्यात आले आहे. शाळेचे नाव- व्हॉट्स अप विद्यालय, तुकडी- ढ, तर हजेरी क्रमांक – 42 असा ठेवण्यात आला आहे. अधोगती पुस्तकातील विशेष बाब म्हणजे कोश्यारी यांना इतिहासात शुन्य गुण दिले आहे. भूगोल, सामान्य ज्ञान या विषयांत अनुक्रमे 35, 34 गुण तर नागरिक शास्त्रात जेमतेम 17 गुण दिले आहेत. कलेत मात्र त्यांना 100 गुण बहाल करण्यात आले आहेत.
नंतर मुख्यध्यापकांच्या नावाने शेरा देताना, सदर विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता पाहता पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचेही म्हटले आहे. या विद्यार्थ्याची वर्तणूक पाहता याची सुरुवात बालवाडीपासून सुरू करणे योग्य राहील, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
मुख्यममंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटीनंतर म्हटले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यकाळात राजभवनात अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले. तसेच, राजभवनातील विस्तारित इमारतीचे बांधकाम करण्यात आले. याशिवाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कार्यक्रमांना स्वतः उपस्थित राहिलेले राज्यपाल अशीही आठवण महाराष्ट्राला कायमच राहील. त्यांनी राज्य सरकारला केलेले सहकार्य आणि महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान विसरता येणार नाही.