पुणे – एनसीबीने कारवाई केल्यानंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक केली. यानंतर क्रुझवरची छायाचित्र व व्हिडिओ व्हायरल झाले. यामध्ये आर्यनसोबत एका व्यक्तीने काढलेला सेल्फी मोठा चर्चेत आला. या व्यक्तीसंदर्भात एनसीबीने खुलासा केला की तो आमचा अधिकारी नाही.
दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दोन व्यक्तींची नावे घेतली. यातील एक व्यक्ती के पी गोसावी असल्याचे उघड झाले. या गोसावीवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात 2018 मध्ये एक फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे.
फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी सांगितले की, गोसावीवर 29/5/2018 रोजी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी चिन्मय श्रीधर देशमुख (22, रा.कसबा पेठ) यांनी फिर्याद दिली होती. त्याने दिलेल्या फिर्यादीनूसार गोसावी याने फेसबुकवरील हॉटेल मॅनेजमेंट जॉब्स ग्रुपवर हॉटेल मॅनेजमेंटच्या जागा असल्याची जाहिरात केली होती.
जाहिरात वाचून संपर्क केला असता, त्याने ई मेल आयडीवर बायोडाटा पाठवण्यास सांगितले. यानंतर मेलशिया येथे नोकरी असल्याचे सांगत एका बॅंक अकाऊंटवर 309313 रुपये भरण्यास भाग पाडून फसवणूक केली होती. गुन्हा दाखल झाल्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करेपर्यंत गोसावी पोलिसांच्या हाती आला नव्हता. त्याला फरार घोषीत करण्यात आले होते. यानंतर त्याला अटक झाली होती का ? कि त्याने न्यायालयातून अटकपुर्व जामिन घेतला होता याची माहिती घेतली जात आहे.