पुणे – शिवसेनेचे कार्यकर्ते दीपक मारटकर यांच्या खूनप्रकरणी अटक केलेल्या दहा आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बुधवार पेठेतील वर्चस्ववादातून गुंडा बापू नायर आणि स्वप्निल उर्फ सतिश मोडवे टोळीतील सदस्यांकडून संघटितरीत्या मारटकर यांचा खून करण्यात आल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासातून उघडकीस आले आहे.
अश्विनी सोपान कांबळे, महेंद्र मदनलाल सराफ, निरंजन सागर म्हंकाळे, प्रशांत उर्फ सनी प्रकाश कोलते, राहुल श्रीनिवास रागीर, रोहित उर्फ बाळा कमलाकर कांबळे, रोहित दत्तात्रय क्षिरसागर, संदिप उर्फ मुंगळ्या प्रकाश कोलते, लखन मनोहर ढावरे, चंद्रशेखर रामदास वाघेल असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.
बुधवार पेठेतील गवळी आळीमध्ये दि. २ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास आरोपींनी धारदार शस्त्राने वार करीत दीपक मारटकर यांचा खून केला.
याप्रकरणी आरोपींना अटक केल्यानंतर फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर आणि परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला होता. अपर पोलीस आयुक्त दक्षिण विभाग डॉ. संजय शिंदे यांनी अटक आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार आरोपींविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा १९९९ नुसार कलमांचा समावेश करण्यात आला आहे.