पाटणा – बिहारमधील विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचे पुनरागमन होण्याचे संकेत ओपिनयन पोलमधून दिसत आहेत. लोकनीती-सीएसडीएसने प्रसिद्ध केलेल्या ओपिनियन पोलनुसार या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएला 133 ते 143 जागा मिळणार आहेत. तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला 88 ते 98 जागा मिळतील. तर स्वतंत्रपणे लढत असलेल्या एलजेपीला 2 ते 6 आणि इतर पक्षांना 6 ते 10 जागा मिळण्याची शक्यता आहे.
या सर्वेनुसार यंदाच्या निवडणुकीत एनडीएला 38 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 32 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. या ओपिनियन पोलमधील आकडेवारीमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या लोकप्रियतेत मोठी घट झाली असून, तेजस्वी यादव यांच्या लोकप्रितेत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
राज्यातील पुढील मुख्यमंत्रिपदासाठी नीतीश कुमार यांना 31 टक्के मतदारांनी पाठिंबा दिला. तर राजद नेते तेजस्वी यादव यांना 27 टक्के मतदारांनी पाठिंबा दिला. एनडीएपासून वेगळे होत स्वतंत्रपणे निवडणूक लढवणाऱ्या चिराग पासवान यांना 5 टक्के मतदारांनी पाठिंबा दर्शवला. तर भाजपाचे नेते सुशील कुमार मोदी यांना चार टक्के मतदारांनी पाठिंबा दिला. सर्वेमध्ये 4 टक्के मतदारांनी लालूप्रसाद यादव यांना समर्थन दिले.
दरम्यान, नितीश कुमार यांच्या कारभारावर समाधानी असलेल्या मतदारांच्या संख्येमध्येही मोठी घट सर्वेमध्ये दिसून आली आहे. सर्वेत सहभागी झालेल्या राज्यातील 52 टक्के मतदारांनी नितीश कुमार यांच्या कारभारावर समाधान दर्शवले. तर 44 टक्के मतदारांनी नितीश कुमार यांच्या कारभाराबाबत असमाधान व्यक्त केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर 61 टक्के मतदारांनी समाधान आणि 35 टक्के मतदारांनी असमाधान व्यक्त केले.