नवी दिल्ली – करोनावरील लसींचा पहिला साठा लवकरच देशभरात पाठवण्यासाठी केंद्र सरकार सज्ज झाले आहे. तो साठा स्वीकारण्यासाठी तयार राहण्याची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सल्लागार डॉ. प्रदिप हल्दर यांनी 5 जानेवारीला सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवले. त्यामध्ये लसींचा साठा स्वीकारण्यासाठी सर्वतोपरी तयारीचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रासह 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लसींच्या पुरवठ्यासाठी विशेष केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. तर, उर्वरित 18 छोट्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत सरकारी वैद्यकीय भांडारांमध्ये लसी पोहचवल्या जाणार आहेत.
तिथून नोंदणीकृत लाभार्थींचा विचार करून जिल्हास्तरावर लसींचे वितरण होईल. त्यासंदर्भात लवकरच आणखी एक पत्र पाठवले जाणार आहे. देशात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन लसींच्या मर्यादित आपत्कालीन वापराला 3 जानेवारीला मंजुरी देण्यात आली.
तेव्हापासून 10 दिवसांत लसींच्या उपलब्धतेची ग्वाही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. अर्थात, लसींच्या उपलब्धतेविषयीचा अंतिम निर्णय सरकारकडून घेतला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, लसीकरणाची दुसरी देशव्यापी रंगीत तालीम उद्या (शुक्रवार) होणार आहे.