लंडन/ रोम/ पॅरिस – करोनाच्या साथीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढायला लागल्याने युरोपातील काही देशांमध्ये नव्याने लॉकडाऊन लागू केला जात आहे. ख्रिसमस, नवीन वर्ष आणि सुटीचे दिवस सुरू झाल्यावर झालेल्या प्रवासामुळे युरोपातील करोना रुग्णंाच्या संख्येत मोठी वाढ होताना आढळले आहे.
त्यातच ब्रिटनमधील करोनाच्या नवीन विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढायला लागल्याने काही देशांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून आगोदरच लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये सर्वप्रथम नवीन विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी कडक उपाय योजना लागू केल्या गेल्या आहेत. त्यापाठोपाठ जर्मनी, ऑस्ट्रिया आणि इटलीसारख्या देशांमध्येही महिन्याच्या शेवटपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
युरोपातील बहुतेक देशांमध्ये आता करोना विरोधी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र करोनाना प्रचंड प्रकोप झालेल्या युरोपातील अनेक देशांमध्ये अजूनही संसर्ग झालेले रुग्ण सापडत आहेतच. या प्रचंड रुग्णसंख्येमुळे तेथील आरोग्य व्यवस्थेवर आगोदरच ताण आलेला होता. आता त्यात लसीकरण मोहिमेचीही भर पडली आहे. इटली आणि ग्रीसमध्ये सुयांचा तुटवडा असल्याची तक्रार आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांनी केली आहे. स्पेनमध्ये लस देण्यासाठी पुरेसे परिचारिका व प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी नाहीत.
ब्रिटनमध्ये पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नव्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापर्यंत नव्याने लॉकडाऊन जाहीर केले गेले आहे. गेल्या हिवाळ्यात ज्या उपाय योजना सर्वप्रथम लागू केल्या गेल्या होत्या, त्या पुन्हा लागू केल्या गेल्या आहेत. इंग्लंडमधील शाळा आणि महाविद्यालये पुन्हा एकदा बंद केले गेले आहेत.
जर्मनीमध्ये लॉकडाऊन आणखी तीन आठवड्यांनी वाढवायला चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी मंजूरी दिली आहे. तर ख्रिसमसच्या वेळी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांना जानेवारीच्या अखेरीपर्यंत वाढवण्याचा निर्णय इटलीमध्ये घेतला गेला आहे. ग्रीसमध्ये तुलनेने कमी असलेल्या प्रादुर्भावाच्या तुलनेत दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक असल्याने 3 जानेवारी ते 11 जानेवारीपर्यंत नव्या लॉकडाऊनची घोषणा केली गेली आहे.
जपानमध्ये टोकियोत आरोग्य आणीबाणीचा प्रस्ताव
जपान सरकारने गुरुवारी शुक्रवारपासून एक महिन्याची आणीबाणी जाहीर करण्याचा प्रस्ताव ठेवला. अर्थमंत्री यासुतोशी निशिमुरा यांनी सल्लागारांसह बैठकीपूर्वी 8 जानेवारी ते 7 फेब्रुवारी या कालावधीत चार प्रांतांसाठी आपत्कालीन स्थिती स्थापण्याचा सरकारचा प्रस्ताव असल्याचे सांगितले. इतर देशांच्या तुलनेत जपानमधील करोनाची स्थिती जरा बरी आहे. मात्र आता नव्याने करोनाच्या रुग्णांची दैनंदिन संख्या वाढायला लागल्याचे दिसते आहे. बुधवारी जपानमध्ये एकाच दिवसात 6 हजार रुग्ण सापडले होते.