लंडन – सर्वसामान्य सर्दीमुळे शरीरात निर्माण झालेल्या ऍन्टीबॉडीज या करोना विषाणूच्या प्रादुर्भावापासूनही बचाव करू शकतात, असा निष्कर्श संशोधकांनी काढला आहे. हे संशोधन करणाऱ्यांमध्ये ब्रिटनमधील फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्युटमधील संशोधकांचाही समावेश आहे.
विषाणूच्या संसर्गानंतर निर्माण झालेल्या प्रतिकारशक्तीमुळे निर्माण झालेल्या ऍन्टीबॉडीज पुढे दीर्घकाळ रक्तामध्ये अस्तित्वात राहतात आणि नव्याने संसर्ग होण्यास प्रतिबंध करतात, असे या संशोधनामध्ये म्हटले अहे. “सायन्स’ या विज्ञानविषयक नियतकालिकामध्ये या संदर्भातील लेख प्रसिद्ध झाला आहे.
काही बालकांना करोना विषाणूचा संसर्ग झालेला नसतानाही त्यांच्या शरीरामध्ये करोना विषाणूला प्रतिक्रिया म्हणून निर्माण झालेल्या ऍन्टीबॉडीज सापडल्या आहेत. करोनाच्या संसर्गानंतर निर्माण होणाऱ्या ऍन्टीबॉडीजसारख्याच या ऍन्टीबॉडीज आहेत.
मात्र त्या सर्वसामान्य सर्दीमुळे निर्माण झालेल्या आहेत. करोना रुग्णाच्या रक्ताच्या नमुन्यांची संसर्ग न झालेल्या व्यक्तींच्या रक्ताबरोबर अतिसंवेदनशील ऍन्टीबॉडी टेस्टच्या आधारे पडताळणी केल्यावर त्यातील साम्य आढळून आले. निष्कर्श सिद्ध करण्यासाठी 2011 ते 2018 दरम्यान गोळा केल्या सुमारे 300 नमुन्यांचे प्रयोगशाळेत विश्लेषणही केले गेले.
यातील बहुतेक नमुन्यांमध्ये सर्दीनंतरच्या ऍन्टीबॉडीज करोना विषाणूविरोधात परिणामकारक असल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकारे संसर्ग न होताही ऍन्टीबॉडी कशा निर्माण झाल्या हे शोधण्यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे, असेही या संशोधनाचे लेखक केविन एनजी यांनी म्हटले आहे.