अहमदाबाद – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवण्याला स्थगिती मिळावी यासाठी याचिका दाखल केली आहे. त्या प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने मंगळवारी राहुल यांना तात्पुरता दिलासा देण्यास नकार दर्शवला. तसेच, उन्हाळी सुटीनंतर अंतिम निर्णय दिला जाईल, असे स्पष्ट केले. उच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुटीचा कालावधी 8 मे ते 3 जून असा आहे.
कर्नाटकात एप्रिल 2019 मध्ये प्रचार सभेत बोलताना राहुल यांनी मोदी आडनावाविषयी टिप्पणी केली. त्यावरून भाजपचे गुजरातमधील आमदार पुर्णेश मोदी यांनी मानहानीचा दावा दाखल केला. त्या प्रकरणी सुरतमधील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवत दोन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली. त्यामुळे राहुल यांची खासदारकी रद्द झाली. त्यानंतर दोषी ठरवण्याला स्थगिती मिळावी अशी विनंती करणारी याचिका त्यांनी सुरत सत्र न्यायालयात दाखल केली. मात्र, तिथे दिलासा न मिळाल्याने राहुल यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.