पिंपरी – मित्राची परिसरात प्रतिष्ठा वाढू लागल्याच्या कारणावरून मित्राने त्याच्या अल्पवयीन साथीदारासोबत मिळून गोळ्या झाडून मित्राचा खून केला. ही घटना सोमवारी (दि. 22) चिखली येथे घडली. या प्रकरणातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून अटक केली आहे.
सौरभ उर्फ सोन्या बाळासाहेब पानसरे (वय 23, रा. फलकेवस्ती, मोईगाव, ता. खेड. मूळ रा. कासारमळा, पानसरेवाडी, सुपा, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासोबत त्याच्या अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कृष्णा उर्फ सोन्या तापकीर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.22) दुपारी चिखली गाव येथे कृष्णा उर्फ सोन्या तापकीर या तरुणाचा खून झाला. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भर दिवसा गोळीबार करून सोन्या तापकीर याचा खून केला. घटना घडल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकला या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याबाबत आदेश देण्यात आले. पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दोन पथके तयार केली. दरम्यान पोलिसांना सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सरताळा या गावामध्ये आरोपी सौरभ पानसरे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक इमरान शेख, पोलीस अंमलदार बाळासाहेब कोकाटे, मनोजकुमार कमले, महादेव जावळे, सोमनाथ बोऱ्हाडे, फारूक मुल्ला, अमित खानविलकर, सचिन मोरे, उमाकांत सरवदे, प्रमोद हिरळकर, अजित रुपनवर, विशाल भोईर, मारोती जायभाये, तानाजी पानसरे, नागेश माळी यांनी केली.