नवी दिल्ली – दिल्लीच्या तिहार तुरुंगात असलेले आम आदमी पक्षाचे नेते व माजी मंत्री सत्येंद्र जैन काल रात्री बाथरूममध्ये घसरून पडल्याने जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जैन यांना किरकोळ जखमा झाल्या असून तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात आणण्यात आले असल्याचे जेल प्रशासनाने म्हटले आहे.
जैन यांना काल चक्कर आली आणि त्यामुळे ते पडल्याचे आम आदमी पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. त्यांना दिनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मनिलॉंड्रिंग प्रकरणात जैन गेल्या एक वर्षापासून तुरुंगात आहेत. ते दिल्ली सरकारमध्ये मंत्री होते. गेल्या आठवड्यात त्यांना रुग्णालयात दोनदा दाखल करण्यात आले आहे. जैन यांच्या कंबरेच्या हाडाला दुखापत झाली असल्याचे त्यांच्या पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. जैन यांना आता डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.