मेंदूज्वर रोखण्यासाठी प्रयत्न – नितीश कुमार

आजाराचे मूळ कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांचे पथक कार्यरत

पाटणा – बिहारमध्ये मेंदूज्वरामुळे जे घडले ते अत्यंत दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले आहे. सरकारने आजाराचा प्रसार रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. याप्रकरणी तज्ज्ञांचे एक पथक निर्माण करत आजाराचे मूळ शोधून काढण्याचा प्रयत्न झाल्याचे नितीश म्हणाले.

मेंदूज्वरामुळे सुमारे 720 मुले रुग्णालयात दाखल झाली. यातील 586 मुलांची प्रकृती सुधारली तर 154 जणांचा मृत्यू झाला आहे. सरकार सातत्याने आजार रोखण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही तज्ज्ञांचे एक पथक स्थापन केले आहे. हे पथक आजार नेमका कशामुळे होतो याचा शोध घेत आहे. मेंदूज्वर विषय अहवाल अमेरिकेत पाठवून याप्रकरणी माहिती घेण्यात आली आहे. 2014 पासून या आजाराच्या कारणांचा शोध घेण्यासाठी संशोधन सुरू आहे. पण अद्याप अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलेलो नाही. रिकाम्यापोटी लीची खाल्ल्याने मुलांना आजार झाल्याचे काही जणांचे मानणे आहे.

रुग्णालयात दाखल रुग्ण आणि त्यांच्या पालकांची भेट घेतली आहे. सर्वांशी संवाद साधल्यानंतर बहुतांश पीडित गरीब कुटुंबातील आहेत आणि त्यातही मुलींची संख्या अधिक असल्याचा निष्कर्ष काढला. याप्रकरणी सर्वेक्षण आवश्‍यक असल्याचे मला वाटते असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.