बीआरटी मार्गातून धावताहेत साध्या बसेस

प्रवाशांच्या जिवाशी खेळ; स्थानकाच्या बाजूला दरवाजा नसल्याने अपघाताची शक्‍यता

पिंपरी – बीआरटी मार्गामध्ये धावण्यासाठी बीआरटीच्याच बसेसनाच परवानगी आहे. बीआरटी स्थानकाची रचना आणि बसच्या दरवाजाची रचना एकसारखी असल्याने केवळ बीआरटी बसेसचाच बीआरटी मार्गांमध्ये वावर असणे गरजेचे. साध्या बसेसचे दरवाजे बीआरटी स्थानकाच्या विरुद्ध दिशेला असल्याने साध्या बस बीआरटी मार्गातून सोडण्यात येत नाहीत. परंतु सध्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) साध्या बसेस जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील बीआरटी मार्गातून धावताना दिसत आहे. दरवाजे स्थानकाच्या विरुद्ध दिशेला असल्याने आणि बीआरटी मार्ग अरुंद असल्याने बसमधून उतरतांना व चढतांना अपघाताची शक्‍यता आहे.

बीआरटी मार्गातून धावण्यासाठी खास पीएमपीकडून बीआरटी स्थानकाच्या दरवाज्यानुसार बसेस बनवण्यात आल्या आहेत. मात्र, या मार्गातून सर्रास साध्या बसेस सुद्धा धावत असल्याने प्रवाशांना धोकादायक रित्या उतरावे लागत आहे. बीआरटी मार्गातून प्रवाशांना जलद गतीने प्रवास व्हावा यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करुन बीआरटी मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे.

बीआरटी मार्गात वारंवार अडथळ्याबाबत तक्रारी येऊनसुद्धा मार्गामध्ये अडथळ्यांची शर्यत थांबता थांबत नसून त्यात, पीएमपी प्रशासन आणखीनच अडथळा निर्माण करीत आहे. बीआरटी मार्गातून धावण्यासाठी बीआरटी थांब्याच्या रचनेनुसार बसेसचे दरवाजे बनवण्यात आले आहेत. मात्र, या मार्गातून साध्या दरवाज्याच्या बसेस पीएमपी चालक-वाहक दामटत असल्याने प्रवाशांच्या जिवाशी खेळ चालवला आहे.

“बीआरटी मार्गाला मुलभूत सुविधा पुरविणे हे बीआरटी प्रशासनाचे काम आहे. मात्र पीएमपी बसचे संचलन कसे करायचे आणि कुठल्या बसेसने करायचे, हे पूर्णत: पीएमपी प्रशासनावर अवलंबून आहे. याबाबत त्यांना सूचना दिल्या जातील.
– विजय भोजने, प्रवक्‍ते, बीआरटी.

प्रशासन चालकांना कधी आवर घालणार?

पीएमपीच्या साध्या बसेसला बीआरटी मार्गातून प्रवास करता येत नाही. बीआरटी मार्गातून प्रवास करणाऱ्या बसेसला बीआरटी मार्गानुसार थांबे तयार करण्यात आले असून ऑटोमॅटिक सिस्टम बसवण्यात आली आहे. जेणेकरुन प्रवाशांना जलद गतीने उतरता-चढता यावे. बीआरटी मार्गाचे दरवाजे हे साधारणपणे उजव्या बाजूला असतात. तर साध्या बसेसचे दरवाजे डाव्या हाताला असतात. यामुळे बीआरटी मार्गातून धावणाऱ्या साध्या बसेसच्या प्रवाशांना जीव मुठीत धरुन बसखाली उतरावे लागत आहे.

“बीआरटी मार्गातून पीएमपीच्या साध्या बसेस जाण्यास मुभा नाही. जर, अशाप्रकारे बसेस जात असतील तर यासंदर्भात सर्व आगारांना सक्त सूचना देण्यात येतील. तसेच बीआरटी मार्गात साधी बसेस आढळल्यास नक्की कारवाई केली जाईल
– अनंत वाघमारे, व्यवस्थापक, बीआरटीएस

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.