मुंबई – मी अजित पवार (Ajit Pawar,) यांना मानतच नाही. त्यामुळे त्यांना सिरीयस घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा तिखट शब्दांत भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा शरसंधान साधले आहे. त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी भाजप व अजित पवार गटात बेबनाव निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे.
पडळकर व पवारांतील वाद अवघ्या राज्याला माहिती आहे. पडळकरांनी आतापर्यंत अनेकदा शरद पवार व त्यांच्या कुटुंबीयांवर टीका केली. त्यानंतर अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेल्यामुळे त्यांच्या टीकेची धार कमी होण्याची शक्यता होती. पण त्यांनी सोमवारी अजित पवारांवर टीकेची झोड उठवली आणि त्यांच्यातील धुमसणारा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला.
या प्रकरणी पत्रकारांनी गोपीचंद पडळकर यांना छेडले असता त्यांनी आपण अजित पवारांना गांभिर्याने घेत नसल्याचे स्पष्ट केले. आरक्षणाच्या मुद्द्यावर अजित पवार माझ्या पाठीशी उभे राहिले किंवा नाही राहिले त्याचा जास्त फरक पडत नाही. मी अजित पवारांना सिरीयस घेत नाही. त्यांना मानतही नाही, असे पडळकर म्हणाले.
धनगर आरक्षणाच्या म्ुद्यावरून आ. पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. पत्रकारांनी त्यांना याविषयी तुम्ही अजित पवारांना का पत्र लिहिले नाही, असा प्रश्न केला. त्याला उत्तर देताना पडळकरांनी अजित पवार लबाड लांडग्याचे लबाड पिल्लू असल्याची टीका केली होती. त्यानंतर त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा उल्लेख लबाड लांडग्याची लेक म्हणून केला.
नंतर सावरासावर
माझ्या समाजाचा विषय आल्यास मी समाजाच्या बाजूने ठामपणे उभा आहे. अजित पवारांविषयी बोलण्याचा किंवा त्यांच्यावर टीका करण्याचा हेतू नव्हता. पण तुमच्यासारख्या एका पत्रकाराने मला तुम्ही अजित पवारांना पत्र का दिले नाही हे विचारले. त्यावर मी त्यांना पत्र देऊन काहीच फायदा नाही, असे उत्तर दिले, असे म्हणत पडळकरांनी नंतर याप्रकरणी सावरासावर केली आहे. पडळकर यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी त्यांच्यावर शिवराळ भाषेत हल्ला चढवला. त्यांनी पडळकरांचा उल्लेख गोप्या म्हणून करत त्यांना डुकराची उपमा दिली.