मुंबई – “विघ्नहर्ता’ जनतेसमोरील सर्व अडथळे दूर कर, अशी प्रार्थना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी गणपती चरणी केली आहे. मुख्यमंत्री शिंदे (eknath shinde) यांनी गणेश चतुर्थीनिमित्त (Ganeshotsav 2023) त्यांच्या “वर्षा’ या सरकारी निवासस्थानी श्रीगणेशाच्या मुर्तीची स्थापना केली.
“मी सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देतो. मी काल जम्मू-काश्मीरमध्ये होतो. श्रीनगरच्या लाल चौकात लोक गणेशोत्सव साजरा करत होते.त्यामुळे विघ्नहर्ता मायबाप जनतेसमोरील अडचणी नक्कीच दूर करेल’, असेही यावेळी मुुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले.
महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आजपासून गणपती उत्सवाला सुरुवात झाली आहे. घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी गणपतीच्या मूर्तीची स्थापना करून पूजा केली जात आहे. महाराष्ट्रात गणेश चतुर्थी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी देखील श्री गणेशाची स्थापना झाली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब पुजा करुन श्रीगणेशाची विधीवत पुजा केली.
अजित पवारांकडूनही शुभेच्छा !
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुखकर्ता, विघ्नहर्ता श्रीगणरायांच्या चरणी वंदन केले असून राज्यातील जनतेला श्री गणेश चतुर्थी आणि श्रीगणेशोत्सवाच्या भक्तीमय शुभेच्छा दिल्या आहेत.श्रीगणरायांच्या आगमनासोबत घराघरात धनधान्याची समृध्दी येईल.
समाजात आनंद, उत्साह, भक्ती, चैतन्याचे वातावरण निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. भक्तिमय वातावरणात साजरा होत असलेला गणेशोत्सव निसर्गाची काळजी घेत पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.