#NZvAUS | न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय

ड्युनेडीन – सलामीवीर मार्टिन गुप्टिलच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर केवळ 4 धावांनी रोमहर्षक विजय मिळाला.

गुप्टिलने 97 धावांची तुफानी खेळी करताना न्यूझीलंडला टी-20 सामन्यात 219 धावांचे आव्हान उभे करून दिले. नाणेफेक गमावल्यानंतर न्यूझीलंडची धावसंख्या आव्हानात्मक होती. ऑस्ट्रेलियाने प्रयत्नांची शिकस्त केली. पण, त्यांचे प्रयत्न 4 धावांनी कमी पडले. त्यांचा डाव 8 बाद 215 असा रोखला गेला. न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज मिशेल सॅन्टनरने 31 धावांत 4, तर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनने 43 धावांत 3 गडी बाद केले.

संपूर्ण सामन्यात षटकामागे जवळपास 10.9 च्या धावगतीने 434 धावा निघाल्या. यात 30 षटकारांचा समावेश होता. ऑस्ट्रेलियाच्या डावात मार्कस स्टोनिसने 37 चेंडूंत 38 धावा केल्या. मात्र, गुप्टिलची 50 चेंडूंतील 97 धावांची खेळी सामन्यात निर्णायक ठरली. त्याचवेळी न्यूझीलंडच्या जेम्स नीशामचे अखेरचे षटकही नाट्यमय ठरले. त्याने अखेरच्या षटकांत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 15 धावांची आवश्‍यकता असताना दोन गडी बाद केले. नीशामने फलंदाजीतही चमक दाखवताना सहा षटकारांसह नाबाद 45 धावांची खेळी केली होती.

गुप्टिलने षटकारांचा पाऊस पाडताना टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 132 षटकार मारण्याचा विक्रम केला. त्याने रोहित शर्माला (127) मागे टाकले. ऑस्टेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घेताना त्याने 8 षटकार आणि 9 चौकार लगावले. मात्र, तो तिसऱ्या टी-20 शतकापासून वंचित राहिला.

ऑस्ट्रेलियाला हे आव्हान पेलवले नव्हते. मॅथ्यू वेड, ऍरन फिंच, ग्लेन मॅक्‍सवेल झटपट बाद झाल्याने त्यांची अवस्था 10.1 षटकांत 3 बाद 87 अशी झाली होती. त्यानंतर जोश फिलीप आणि स्टोनिस याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याला सॅन्टनेरने लगाम घातला.

सामन्याच्या 13 व्या नाट्यमय षटकांत सॅन्टनेरने तिसऱ्या चेंडूवर फिलीप, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर ऍश्‍टन ऍगर, मिशेल मार्श यांना बाद करून ऑस्ट्रेलियाच्या आव्हानातील हवा काढून घेतली. त्यानंतर स्टोनिसने डॅनिएल सॅम्सच्या साथीत 36 चेंडूंतच 87 धावांची भागीदारी करताना सामन्यात रंगत आणली. पण, अखेरच्या षटकांत नीशामने पहिल्या चेंडूवर सॅम्स आणि पाचव्या चेंडूवर स्टोनिसला बाद करून न्यूझीलंडचा विजय साकार केला.

संक्षिप्त धावफलक –

न्यूझीलंड – 20 षटकांत 7 बाद 219 धावा. (मार्टिन गुप्टिल 97, केन विल्यम्सन 53, जेम्स नीशाम 45, केन रिचर्डसन 3-43) वि. वि. ऑस्ट्रेलिया – 20 षटकांत 8 बाद 215 धावा. (मार्क्‍स स्टोनिस 78, डॅनिएल सॅम्स 41, मॅथ्यू वेड 24, मिशेल सॅन्टनेर 4-31, जेम्स नीशाम 2-10).

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.