नवी दिल्ली – जागतिक बाजारात डॉलर बळकट होत असल्यामुळे सोन्याचे दर कमी होत आहेत. त्यामुळे भारतीय बाजारातही कालपासून सोन्याच्या दरामध्ये मोठी घट झाली आहे.
शुक्रवारी दिल्ली सराफात सोन्याचा दर 342 रुपयांनी कमी होऊन 45,599 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. शुक्रवारी चांदी तब्बल 2,007 रुपयांनी कोसळून चांदीचा दर 67,419 रुपये प्रति किलो झाला.
सोन्याचे दर कमी होत असल्याबद्धल एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारात गुंतवणूकदार सोन्यातून अंग काढून घेत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम भारतावरही होणे अपेक्षित आहे.
विशेष म्हणजे रुपयाच्या दरात घट होऊनही सोन्याचे दर कोसळल्याचे दिसून आले. जागतिक बाजारात शुक्रवारी सोन्याचे दर 1,760 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर 26.78 तर डॉलर प्रति औंस या पातळीवर गेले होते. आजच्या घटनाक्रमातील विशेष बाब म्हणजे जागतिक बाजारात शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळत असूनही सोन्याच्या दरामध्ये घट होत गेली. मात्र सोन्याच्या दरात घट होत असतानाच क्रुड आणि इतर कमॉडीटीच्या दरात मात्र महागाई वाढण्याच्या शक्यतेमुळे वाढ होत आहे.
भारतात काही महिन्यापूर्वी सोन्याचे दर 58 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीपर्यंत गेले होते. नंतर सोन्याच्या दरात घट होत गेली. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सोन्यावरील आयात शुल्कात पाच टक्क्यांची घट केली. त्यामुळे सोन्याच्या दरात आता विक्रमी पातळीवरुन दहा हजार रुपयापर्यंत घट झाली आहे.
सोन्याचे दर 50 हजार रुपयांच्या खाली असल्यानंतर दीर्घ पल्ल्याचा विचार करून गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खरेदी फायदेशीर होऊ शकते असे विश्लेषक सांगतात. त्यांच्या मते यावर्षी सोन्याचा दर 63 हजार ते 68 हजारापर्यंत वाढू शकतो.