ऑकलंड :- न्यूझीलंड संघाचा आक्रमक फलंदाज जेसी रायडर अचानक गायब जाल्याचे वृत्त पसरले व न्यूझीलंडच्या चाहत्यांच्या काळजात धस्स झाले. एकेकाळी आपल्या आक्रमक फलंदाजीमुळे तमाम गोलंदाजांच्या मनात धडकी भरवणारा हा फलंदाज आज व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे स्वतःची ओळख व कारकीर्द संपवून बसला आहे.
वयाच्या 14 व्या वर्षी त्याला वडील सोडून गेले; परंतु हार न मानता त्याने आपल्या वडीलांप्रमाणेच क्रिकेटपटू बनण्याचे ठरवले. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनला देखील. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात त्याने न्यूझीलंड संघात स्थान मिळवले. मात्र अतीपैशांमुळे तो बेभान झाला व त्याला मद्यपानाचे व्यसन लागले.
2013 साली ख्राइस्टचर्च येथील एका क्लबच्या बाहेर झालेल्या एका भांडणात त्याला गंभीर दुखापत झाली व तो कोमामध्ये गेला. तब्बल 56 तास या अवस्थेत काढल्यावर तो बरा होऊन घरी परतला व सराव करत कामगिरी सिद्ध करत पुन्हा एकदा न्यूझीलंड संघात दाखल झाला. त्याने आपले पुनरागमन शतक फटकावून साकार केले होते.
2014 साली परत तो वादात सापडला होता. भारत दौऱ्यावर जाताना नियमांचे पालन न केल्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर 2015 सालच्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेतही खेळण्याची त्याला संधी होती. मात्र, त्याने न्यूझीलंड अ संघासह अमिरातीला जाण्यास नकार दिला व त्यामुळे त्याला विश्वकरंडकासाठी निवडलेल्या संघातूनही वगळण्यात आले होते.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये तो इंडियन कॅपिटल्सकडून खेळला होता. त्यानंतर त्याचे मद्यपानाचे व्यसन वाढत गेले व तो क्रिकेटपासून दुरावला. आता तर त्याचा ठावठिकाणाही कोणी सांगू शकत नाही.