नवी दिल्ली – चीनमधील सत्तारुढ पक्षाशी संबंधित सायबर गुन्हेगारांनी न्यूझिलंडच्या संसदेच्या यंत्रणांमध्ये २०२१ साली सायबर हल्ला केला होता, असा आरोप न्यूझिलंडने केला आहे. सुरक्षा मंत्र्यांनी हा आरोप केला आहे.
न्यूझिलंडच्या आगोदर ब्रिटन आणि अमेरिकेनेही चीनवर सायबर गुन्हेगारीचे आरोप केले होते. चीनच्या ७ सायबर गुन्हेगारांवर या दोन देशांनी गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप ठेवले आणि निर्बंध देखील घातले आहेत. हे सर्व हॅकर चीनमध्येच रहात असून या सर्व हॅकरनी अमेरिकेतील अधिकारी, पत्रकार, प्राधिकरणे, लोकशाहीवादी कार्यकर्ते आणि ब्रिटनमधील निवडणूक निरीक्षकांवरही सायबर हल्ले केले असल्याचे मानले जाते आहे.
सायबर हेरगिरी ही देशाच्या लोकशाही प्रक्रीयेतील हस्तक्षेप असून अशाप्रकारे कोठूनही केलेला हस्तक्षेप अमान्य असल्याचे न्यूझिलंडमधील सरकारी संवाद सुरक्षा विभागाच्या मंत्री ज्युडिथ कोलिन यांनी म्हटले आहे. हे सायबर गुन्हेगार आणि या सायबर हेरगिरीद्वारे न्यूझिलंडच्या संसदीय घटकांना लक्ष्य करण्याच्या उद्योगाचा चीनच्या सरकारशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
न्यूझिलंडच्या संसदीय सल्ला केंद्रावर २०२१ मध्ये झालेल्या सायबर हल्ल्यानंतर नॅशनल सायबर सिक्युरीटी सेंटरने केलेले तांत्रिक विश्लेषणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यातून या सायबर हल्ल्यामागे चीनमधील पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाशी संबंधित एपीटी४० या गटाचा हात असल्याचे निष्पन्न झाले आहे, असे कोलिन म्हणाल्या.
ज्या यंत्रणांना लक्ष्य केले गेले, त्यांच्याबरोबर मिळून काम करून लगेचच सायबर गुन्हेगारांना सायबर स्रोतापासून दूर हटवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.२०२१ मध्ये झालेल्या सायबर हल्ल्यामध्ये न्यूझिलंडच्या महत्वाच्या सरकारी यंत्रणेला लक्ष्य केले गेले होते. यामुळे ही यंत्रणा प्रभावीपणे काम करू शकली नव्हती.
ब्रिटन आणि अमेरिकेने ज्या प्रमाणे चीनवर निर्बंध घातले, तसे न्यूझिलंड घालणार नाही. कारण अशी शिक्षा करण्याचे कायदे न्यूझिलंडकडे नाहीत, असेही कोलिन यांनी स्पष्ट केले.
अशाप्रकारे न्यूझिलंडच्या कारभारातील परदेशी हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असे न्यूझिलंडचे परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स यांनी चीनचे राजदूत वॅन शियालोंग यांना कळवले आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांचीही पीटर्स यांनी गेल्या आठवड्यात भेट घेतली आणि दोन्ही देशांमध्ये महत्वाचे आणि गुंतागुंतीचे संबंध असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.