पुणे– बारावीनंतर व्यावसायिक (व्होकेशनल) अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत.
रिटेल मॅनेजमेंट, मॅन्युफॅक्चरिंग स्किल आणि रेन्यूएबल एनर्जी या तीन विषयांत पदवी अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आला आहे. या बॅचलर इन व्होकेशनल अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना 7 ऑगस्टदरम्यान ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
“बीव्होक इन रिटेल मॅनेजमेंट, मॅन्युफॅक्चरिंग, रेन्यूएबल एनर्जी या तीनवर्षीय तीनही पदवीसाठी बारावी उत्तीर्ण अर्ज करू शकतील. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची विद्यापीठाकडून प्रवेश परीक्षा घेण्यात येईल. प्रवेश परीक्षेच्या निवड यादीनुसार या अभ्यासक्रमांचे प्रवेश जाहीर केले जातील. हे तीनही अभ्यासक्रम विद्यापीठ कॅम्पसमध्ये विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रात चालविले जात आहे, अशी माहिती केंद्राचे संचालक कॅप्टन डॉ. चंद्रशेखर चितळे यांनी दिली. विलंब शुल्कासह 10 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. प्रवेशाची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
उद्योग क्षेत्राची गरज व तरुणांना रोजगाराच्या संधी या दोन्हीचा ताळमेळ साधत या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांची निर्मिती केली आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभवही मिळेल याची विशेष काळजी अभ्यासक्रम तयार करताना घेतली आहे.
– प्रा. डॉ. नितीन करमळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ