पुणे – नवीन वीज मीटर अर्ज करूनही उशिरा मिळत असल्याची तक्रारी नागरिकांच्या वारंवार तक्रारी असतात. त्या पार्श्वभूमीवर आता महावितरणने नवीन वीजजोडण्या देण्यास वेग दिला आहे. कागदपत्रांची पूर्तता, नियमानुसार शुल्क भरल्यास ग्राहकांकडे महावितरणकडून शहरी भागात अवघ्या चोवीस, तर ग्रामीण भागात 48 तासांमध्ये नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
याबाबतचे निर्देश मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी सर्व कार्यालयांना दिले आहेत. पुणे परिमंडलामध्ये गेल्या एप्रिल ते जूनपर्यंतच्या केवळ तीन महिन्यांत 60 हजार 970 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी याबाबतची कार्यवाही त्वरित करण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतच पुरेशा प्रमाणात नवीन वीजमीटर देखील उपलब्ध करून दिले आहेत. त्यानुसार पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह हवेली तालुका तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांचा समावेश आहे. वीजयंत्रणेमधून ग्राहकांच्या मागणीनुसार वीजभारासह नवीन वीजजोडणी देणे शक्य असल्यास कार्यवाही केली जाणार आहे.