पिंपरी – सोशल मीडिया मार्केटिंगचे नावाखाली एका तरुणाची 11 लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना गहुंजे येथील लोढा बेलमेंडो सोसायटीत घडली. आनंद गिरीजाशंकर नगायेच (वय 35, रा. लोढा बेलमेंडो सोसायटी, गहुंजे) यांनी सोमवारी (दि. 24) शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 16 ते 19 जुलैदरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आनंद याचंच्या व्हॉटस्ऍप नंबरवर मॅसेज आला की, मी के मार्केटिंग एजन्सीमधून तुम्हाला मॅसेज केला असून आम्ही लोकांना फ्री ऑनलाईन नोकरीसाठी ऑफर देत आहोत. त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांना सांगितले की, आम्ही सोशल मीडिया मार्केटिंगचे काम करत असून आमची कंपनी जवान मुलांना इन्स्टाग्रामवर त्यांचे फॉलोव्हर्स वाढवण्यासाठी मदत करते. तसेच आमचे काम फक्त इन्स्टाग्रामवर जाऊन फॉलो करणे व प्रत्येक अकाउंटला फॉलो केल्यावर आम्ही तुम्हाला 70 रुपये देणार आहोत.
एका दिवसात तुम्ही लोकांना फॉलो करून तुम्ही 24 हजार रुपये कमवू शकता. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना डेमो तीन अकाउंटचे डेमो दाखवतो, असे सांगत फिर्यादी यांना इन्स्टाग्राम अकाउंटच्या लींक फॉलो करण्यासाठी पाठविल्या. तसेच फॉलो केल्यानंतर त्याचा स्क्रिन शॉट मला पाठवा आम्ही तुम्हाला लगेचच 210 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये पाठवितो.
त्यानंतर फिर्यादी यांनी तीन इन्स्टाग्राम अकाउंटच्या लींक फॉलो केल्या. त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांना एक फॉर्म पाठविला व त्यामध्ये त्यांचे नाव, वय, कामाचा अनुभव, बॅंकेचा अकाउंट नंबर ही माहिती भरून पाठण्यास सांगितली. माहिती पाठविल्यावर ऑनलाईन व्यवहार करून फिर्यादी यांना वेळोवेळी पैसे पाठविण्यास भाग पाडून त्यांची सोशल मीडिया मार्केटिंगच्या नावाखाली एकूण 10 लाख 85 हजार 250 रुपयांची फसवणूक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ याबाबत अधिक तपास करीत आहेत.