पिंपरी -पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतच्या कामाचा नवीन डीपीआर तयार करण्यात आला आहे. त्याबाबतच्या कामाची निविदाही लवकरच प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर काम लवकरच सुरु होईल. त्यामुळे वाकड, रावेत, ताथवडे, पुनावळ्यातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्ली येथे नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीला खासदार बारणेदेखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी मावळ लोकसभा मतदार संघातील विविध महामार्गांच्या कामाचा आढावा घेतला. तसेच ही कामे त्वरित पूर्ण करण्यासाठी गडकरी यांना विनंती केली.
राष्ट्रीय महामार्ग क्र.4 मावळ लोकसभा मतदारसंघातून जातो. मावळ मतदारसंघातील देहूरोड, रावेत, पुनावळे, ताथवडे आणि वाकड येथील अंडरपास व ओव्हर ब्रीजची उंची आणि रंदी कमी आहे. त्यामुळे तिथे वाहतूक कोंडी होते. वाहतुकीची ही समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा सुधारीत डीपीआर करण्यासाठी खासदार बारणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतचे काम “सुवर्ण चतुष्कोण’ या रस्तेबांधणी प्रकल्पाअंतर्गत हाती घेतले होते. हे काम पूर्ण करण्याची आणि त्याच्या देखभालीची जबाबदारी रिलायन्सला दिली होती. परंतु, या मार्गावरील काम ठेकेदाराने पूर्ण केले नाही. अनेक ठिकाणी अर्धवट काम झाले आहे.
या रस्त्याचा सुधारित डीपीआर बनविण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. पाठपुराव्याला यश आले असून सुधारित डीपीआर तयार केला आहे. लवकरच निविदा प्रसिद्ध केली जाणार असल्याचे मंत्री गडकरी यांनी सांगितले. त्यामुळे काम पूर्ण झाल्यास वाकड, ताथवडे येथील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.