पिंपरी – महापालिका निवडणुका अगदी जवळ आल्या असे वाटत असतानाच पुन्हा लांबणीवर पडत आहेत. मात्र मतदारांशी संपर्क ठेवण्यासाठी माजी नगरसेवक व इच्छुक विविध फंडे अन् कल्पना राबवित आहेत. प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यापासून या इच्छुक मंडळींकडून भागातील कार्यकर्ते व मतदारांना त्यांच्या वाढदिवसाचे आकर्षक डीपी बनवून मोबाइल स्टेटस ठेवता यावेत, यासाठी प्रत्येकाने स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. महापालिकेच्या विविध योजनांचीही इच्छुकांकडून मोठ्या प्रमाणत स्वतःच्या फोटोसह मोठी प्रसिद्धी केली जात आहे.
इच्छुक उमेदवारांच्या मोबाइलवर कार्यकर्ते व मतदारांच्या वाढदिवसाचे स्टेट्स झळकू लागले आहेत. या माध्यमातून शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येकजण सरसावल्याचे पहायला मिळत आहे. सर्व इच्छुक असलेल्या उमेदवारांनी स्वतः कार्यक्रमाच्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहून शुभेच्छा देण्याचा सपाटा सुरू केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत आपण कसे वरचढ आणि प्रभावी आहोत, हे दाखविण्यासाठी या मंडळींकडून सोशल मीडियाचा पुरेपूर वापर होताना दिसून येत आहे. सर्वेक्षण करून मतदारांचे वाढदिवस आणि फोटो मिळविण्यात इच्छुक यशस्वी झाले आहेत. प्रभागातील मतदारांचा वाढदिवसानिमित्त व्हॉटस्ऍप, फेसबुक, इन्टाग्राम यावर वाढदिवसाच्या पोस्ट अन् स्टेट्स ठेवून भरभरून शुभेच्छा देत आहेत.
आपल्या प्रभागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी शहरातील चौकाचौकात केक आणून कार्यकर्ते गोळा करून त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहेत. त्यांचे फोटो सर्वत्र शेअर करीत आहेत. सोशल मीडियाचा वापर करीत इच्छुक मंडळी राबवित असलेल्या विविध उपक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. प्रभागातील समस्या, तेथील केलेली विकासकामे देखील नगरसेवक व इच्छुक उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांच्या मोबाइलवर आणि स्वतःच्याही मोबाइल स्टेट्सवर ठेवत आहेत.
महापालिकेच्या नागरवस्ती विभागाने जाहीर केलेल्या विविध योजनांची माहिती स्वतःच्या फोटोसह सोशल मीडियावरून नागरिकांना पाठवत आहेत. शहरातील भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना, बसपा, एमआयएम, मनसे, आरपीआय, वंचित बहुजन आघाडी आदी सर्व पक्षातील नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्धीमाध्यम म्हणून सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करीत आहेत.
नवनवीन उपाय
-मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुकांकडून नवनवीन फंडे
-मतदारांना स्टेट्सच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याचा वाढला कल
-लग्न, वाढदिवसाच्या कार्यक्रमास इच्छुकांची आवर्जुन उपस्थिती
-प्रभागातील सर्व लहान-सहान कामांची माहिती स्टेट्वर
-ठेवण्यावर भर
-महापालिकेच्या विविध योजनांचीही केली जाते मोठी प्रसिद्धी