मुंबई: माथेरानच्या निसर्गरम्य परिसरात फुलपाखरांच्या एकूण 77 नवीन प्रजाती आढळून आल्या आहेत. गेल्या आठ वर्षांतील संशोधनातून या प्रजाती आढळून आल्याची माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीने देण्यात आली आहे. या नवीन प्रजातींमुळे माथेरान परिसरात आढळणाऱ्या फुलपाखरांच्या एकूण प्रजातींची संख्या आता 140 इतकी झाली आहे.
माथेरानचा हा परिसर 214.13 चौरस किमी इतका आहे. सन 2011 पासून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी संस्थेतर्फे हे शोधकार्य केले जात आहे. 125 वर्षांच्या अवधीनंतर या भागात प्रथमच इतके व्यापक संशोधन कार्य करण्यात आले आहे. त्यात या नवीन प्रजातींच्या शोधाबरोबरच या फुलपाखरांच्या एकूणच स्थितींची माहिती मिळवण्यात आली आहे.
या भागातील फुलपाखरांच्या सर्व प्रजातींची वैविध्यता स्थिर असून या भागात नवीन प्रजाती स्थलांतरित होणे किंवा येथील प्रजाती अन्यत्र स्थलांतरित होण्याचे प्रकार फार कमी असतात असे या अभ्यासातून आढळून आले आहे.
या संस्थेने गेल्या आठ वर्षातील संशोधन कार्याची संशोधन पत्रिकाही प्रकाशित केली असून त्यात एकूण 22 हजार 833 निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. या संशोधनासाठी मंदार सावंत, डॉ. निखील मोडक आणि सागर सारंग या संशोधकांनी कलर बारकोड सिस्टीमचा वापर केला होता. 1894 साली ब्रिटिश संशोधक जे. ए. बेथम यांनी माथेरानमधील फुलपाखरांचे संशोधन केले होते. त्यांचेच हे संशोधन कार्य या निमित्ताने पुढे नेण्यात आले आहे.