नेवासा – नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १७ जागांसाठी ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात एकमेकांसमोर उभे ठाकले असून अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ८० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत.
आमदार शंकरराव गडाख गटाचे १७ उमेदवार तर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे भाजप पुरस्कृत गटाचे १६ उमेदवारांमध्ये बाजार समिती निवडणूकीमध्ये ही लढत रंगणार असून दोन अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
हमाल मापाडी मतदार संघाचा एक उमेदवार रमेश भाऊसाहेब मोटे बिनविरोध निवड झाले आहेत. त्यामुळे १८ ऐवजी १७ जागांवर ही निवडणूक होणार आहे.
नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत गरुवारी (दि.२०) रोजी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार याची मोठी उत्सुकता सर्वच पक्षाच्या राजकिय नेते मंडळींसह उमेदवारांना लागलेली होती.
सुरुवातीला १८ जागांसाठी ११७ उमेदवारी अर्ज दाखल झालेले होते. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ८० उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने ३५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत.
नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीची ही निवडणूक आमदार शंकरराव गडाख गटाविरुद्ध भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे या दोन गटात होणार आहे. या निवडणूकीत मतदार राजा काय करिष्मा करणार हा येणारा काळच ठरविणार असला तरी या बाजार समितीच्या निवडणूकीतून सत्ताधाऱ्यांना आपण विरोध दाखवू शकतो ? याचे राजकिय गणित आखण्यासाठीच माजी आमदार मुरकुटे गटाकडून १६ उमेदवार रिंगणात उतरविल्याचे बोलेले जात आहे.