नवी दिल्ली – जगभरात नेहमीच चर्चेत असणारे ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी मायक्रोसॉफ्टविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने अवैधरित्या ट्विटर डेटाचा वापर केल्याचा आरोप एलॉन मस्क यांनी केला आहे. यामुळे पुन्हा एकदा एलॉन मस्क यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मायक्रोसॉफ्टच्या जाहिरात प्लॅटफॉर्मवरून ट्विटरला हटवण्यात आले आहे. याच कारणावरून एलॉन मस्क आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये वाद निर्माण झाला असल्याचं बोललं जात आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
ट्विटरने सुमारे दोन महिन्यांपूर्वीच घोषणा केली होती की त्यांच्या ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस युझर्सना दर महिन्याला किमान 42 डॉलर शुल्क द्यावे लागेल. पण यानंतर मायक्रोसॉफ्टने आपल्या प्रोग्रॅमिंगसाठी एपीआय शुल्क देण्यास नकार दिला होता. तसेच मायक्रोसॉफ्ट कंपनीने जाहिरातींसाठी त्यांचे सोशल मीडिया आणि शेड्युलिंग टूल इथूनपुढे ट्विटरला सपोर्ट करणार नाही.
तसेच येत्या 25 एप्रिलपासून युझर्स ट्विट आणि ड्राफ्टसारखी कामे करू शकणार नाही.ते मागील ट्विट आणि अटॅचमेंटही बघू शकणार नाही असे म्हटलं होतं.याच गोष्टींवरून ट्विटर आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मायक्रोसॉफ्ट कंपनीची स्मार्ट कंपन्सेशन सेवा हि जाहिरातदारांना फेसबूक, इन्स्टाग्राम आणि लिंक्डइनच्या सेवांवर सोशल मीडिया कॅम्पेन मॅनेज करायला मदत करत असते.