नवी दिल्ली : नेपाळमधील माउंट एव्हरेस्टजवळ हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पर्यटकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यामुळे आत बसलेल्या सर्व सहा जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये स्थानिक नेपाळी पायलट आणि मेक्सिकोतील एका कुटुंबाचा समावेश होता.
या कुटुंबाला घेऊन जाणारे हे हेलिकॉप्टर मंगळवारी अचानक बेपत्ता झाले होते. यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. काही तासांनंतर दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर आणि आतील प्रवाशांचे मृतदेह प्रशासनाला मिळाले. यामध्ये मेक्सिकोचे रहिवासी डॉ. सिफुएंटेस जी. फेरांडो यांचे कुटुंब प्रवास करत होते.
एका आठवड्यापूर्वीत त्यांनी भारतातील ताज महालला भेट दिली होती. आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर त्यांनी ताज महालासमोरील आपला फोटोही पोस्ट केला होता. मृतांमध्ये फेरांडो यांच्या कुटुंबातील आणखी एक पुरूष आणि तीन महिलांचा मृत्यू झाला. भारतातील मेक्सिकोचे राजदूत फेडरिको सालास यांनी याबाबत माहिती दिली. मृतदेहांना दुर्घटना स्थळावरून नेपाळची राजधानी काठमांडूला नेण्यात आले. यासाठी दोन हेलिकॉप्टर्सची मदत घेण्यात आली.
एव्हरेस्टवरुन खाली काठमांडूकडे येताना हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. विमानतळ अधिकारी सागर काडेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरला नियोजित मार्ग बदलावा लागला होता. यामुळे कदाचित हा अपघात झाल्याची शक्यता आहे.