नवी दिल्ली : – भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेत 90 मीटर अंतर पार करण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी तयारी करत आहे. सध्या मी या कामगिरीसाठी आवश्यक तो सराव करण्याबरोबरच मानसिक तयारीही करत आहे, असे नीरजने म्हटले आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर आतापर्यंत झालेल्या विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्याने चमकदार कामगिरी केली आहे. मात्र, त्याला अद्याप 90 मीटरचे अंतर गाठता आलेले नाही. स्टॉकहोम येथे झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत त्याने 89.94 मीटर भालाफेक केली होती.
बुडापेस्ट, हंगेरी येथे सध्या सुरू असलेल्या जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नीरज रवाना झाला आहे. त्याला रविवारी होत असलेल्या प्रमुख फेरीत 90 मीटरचे स्वप्नवत अंतर गाठायचे आहे. त्याने गेल्या वर्षी याच स्पर्धेत रजतपदक जिंकले होते. त्याने आतापर्यंत ऑलिम्पिक, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. त्याला केवळ जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकता आलेले नाही.
मला दबावाची सवय झाली आहे.
आपण उद्दिष्ट गाठण्याच्या अगदी जवळ असून हवामानाचीही साथ लाभल्यास हे उद्दिष्टही गाठेन. मोठ्या स्पर्धांपूर्वी काही गोष्टींचा माझ्यावर दबाव असायच्या, पण हळूहळू सवय झाली. दर दोन-चार वर्षांनी होणाऱ्या स्पर्धांमध्ये मी भाग घेतो तेव्हा नक्कीच माझ्यावर मोठी जबाबदारी असते. मी माझ्या सराव आणि कामगिरीवर समाधानी आहे.
दुखापतीमुळे या वर्षाच्या सुरुवातीला मी अनेक स्पर्धांना मुकलो. पण मी लॉसने डायमंड लीगमध्ये परतलो जिथे मी चांगली कामगिरी केली. आता मला फक्त मानसिक तयारी करायची आहे. स्पर्धेत सहभागी होत असताना मला दुखापतीची भीती मनात असू नये, असे मला वाटते. मात्र, आता जागतिक सुवर्णपदक मला खुणावत आहे, असेही नीरज म्हणाला.