पुणे :- जागतिक फुटबॉलमधील स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याला प्रत्यक्ष खेळताना पाहण्याची संधी पुणेकरांना मिळू शकते. रोनाल्डो खेळत असलेला अल नासर क्लब एएफसी विजेतेपद स्पर्धेसाठी पात्र ठरला असून, त्यांचा सामना मुंबई एफसी क्लबशी होण्याची शक्यता आहे. मुंबई संघाचे होम ग्राउंड पुण्यातील बालेवाडी स्टेडियम असल्याने हा योग जुळून येण्याची शक्यता आहे.
रोनाल्डोच्या अल नासर फुटबॉल क्लबने दुबईच्या क्लब शबाब अल अहली क्लबचा 4-2 असा पराभव करत एएफसी चॅम्पियन्स लीगच्या प्ले ऑफमध्ये पात्रता मिळवली. त्यामुळे त्यांचा सामना मुंबई सिटी एफसी क्लबविरुद्ध होण्याची शक्यता बळावली आहे. अल नासर क्लबचा समावेश पश्चिम विभागीय गटात होण्याची शक्यता असून, त्यात मुंबई संघाशी त्यांचा सामना होऊ शकतो.
हा सामना पुण्यातील श्री शिवछत्रपती बालेवाडी क्रीडा नगरीतील मैदानावर होण्याची शक्यता आहे. मुंबई एफसी क्लब हा भारताचा चॅम्पियन्स लीगमधील एकमेव फुटबॉल क्लब असून बालेवाडी हे त्यांचे होम ग्राउंड आहे. या स्पर्धेचे ड्रॉ अनुकूल पडले तर अल नासर व मुंबई एफसी हे दोन संघ एकाच गटात येतील व तसे घडले तर रोनाल्डोला प्रत्यक्ष खेळताना पाहण्याचे भाग्य पुणेकरांना मिळू शकते.
अर्थात तसे ड्रॉ पडणार का व जरी पडले तरीही रोनाल्डो हा सामना खेळण्यासाठी भारतात दाखल होणार का, या प्रश्नाचे उत्तर अद्याप अल नासर क्लबने दिलेले नाही.