पुसेगाव -कठीण प्रसंगी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी संघटनेला साथ द्या, अशी भावनिक हाक शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी दिली.
खटाव तालुक्यातील वर्धनगड येथे मुस्लिम संघटनेच्या जामा मशीद ट्रस्टच्यवतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच अर्जुन मोहिते, शाखाप्रमुख अस्लम शिकलगार, रंग कामगार सेनेचे संजय घोरपडे, शिवसेना संघटक भानुदास कोरडे, तालुकाप्रमुख दिनेश देवकर, मुगुटराव कदम, यशवंत जाधव व मुस्लिम संघटनेचे सर्व पदाधिकारी, मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
प्रताप जाधव म्हणाले, “”शिवसेना कायमच जाती- पातीपलीकडचं समाजकारण करत असून जातीय तेढ निर्माण करण्याचे काम काही समाजकंटकांकडून केलं जातं व आपल्यात दूही निर्माण करण्याचा प्रकार या समाजकंटकांकडून केला जातो. परंतु, याला कोणत्याही प्रकारची दाद न देता आपण सर्व ऐक्याची व सलोख्याची भूमिका घेऊन ज्या ज्या वेळेस असे प्रसंग आले. त्यावेळेला सातारा जिल्ह्यातील शिवसेनेने कायम शांततेची भूमिका घेतली आहे.
येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहून महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम करूया.” आजपर्यंत विकासाच्या दृष्टीने वर्धनगडसाठी कायमच शिवसेनेचे मोठे योगदान असून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपनेते नितीन बानगुडे यांच्या माध्यमातून मोठा निधी आपल्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून गावासाठी आणलेला आहे. इथून पुढेही अग्रेसर राहिल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी कायमच शिवसेनेबरोबर व शिवसेनेच्या विचाराशी जुळलेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे यांना आई वर्धनीमाता बळ देवो, अशी प्रार्थना करूया, असे आवाहन प्रताप जाधव यांनी केले. यावेळी सरपंच अर्जुन मोहिते, भानुदास कोरडे, दिनेश देवकर यांची भाषणे झाली. वर्धनगड जामा मशीदचे अध्यक्ष गफूरभाई शिकलगार, नसीमभाई शिकलगार, हुसेनभाई शिकलगार, कपूर शिकलगार, राजूभाई शिकलगार, भिकणभाई व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाखाप्रमुख अस्लम शिकलगार व आमीन आगा यांनी आभार मानले.