कापूरहोळ -कापूरहोळ पासून (ता. भोर) अवघ्या काही मिनिटांत इंगवली (ता. भोर) येघील नेकलेस पॉइंटवर जाता येत असल्याने नीरा नदीचे नयनरम्य दृश्य पहाण्यासाठी पर्यटक गर्दी करीत आहेत. करोनाबाबतचे कोणतेही नियम न पाळता येथे गर्दी होत असल्याने करोनाचा प्रसार वाढण्याचा धोका आहे.
भोर-कापूरहोळ वाहतुकीच्या मार्गावर खंडोबा माळावरील वळणावर दुचाकी, चारचाकी व मोठ्या गाड्या मनमानी पध्दतीने उभ्या केल्या जात असल्यामुळे या वळणावर पुढील वाहने वाहनचालकांना दिसत नाहीत, रस्ता अरुंद असल्याने गाड्यांना गाडी घासल्या गेल्यास वाहनचालक व पर्यटक यांची भांडणे होत आहेत.
भोर तालुक्यातील नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत आले आहे. भोर, वेल्हा, पुरंदर तालुक्यांतील अनेक प्रेक्षणीय स्थळे नैसर्गिक सौंदर्यने नटलेली आहेत, त्यामुळे पुण्याचे आणि आसपासच्या परिसरातील पर्यटक सुटीच्या दिवशी भोरच्या दिशेने मोठ्या प्रमाणात येत आहेत. भाटघर धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने पाण्याचा विसर्ग स्वयंचलित दरवाजांमार्फत सुरू आहे.
हा देखावा पर्यटकांना आकर्षित करीत असल्याने पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे, या ठिकाणी फोटोग्राफीसुद्धा सुरू असते, यामुळे पर्यटक मोठी गर्दी करीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसून, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसत आहे, त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
भोर तालुक्यात भाटघर व नीरा देवघर धरणे आहेत. ही दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे वाहते पाणी पाहण्याचा आनंद लुटण्यासाठी जिल्ह्यातून पर्यटक येथे येत आहेत. पर्यटक कुटुंबासहित येत असल्याने यात महिला, जेष्ठ नागरिक, लहान मुलांचाही समावेश आहे. करोनाचे भान न ठेवता सोशल डिस्टन्सिंगची खिल्ली उडवली जात आहे, यामुळे करोनाची साखळी न तुटता करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.