चिंचवड शाखेचे काम सर्वांत अग्रेसर
पुणे – भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे एलआयसीने 1 सप्टेंबर रोजी 65 व्या वर्षात पदार्पण केले. सरलेल्या वर्षात एलआयसीच्या पुणे विभाग क्रमांक-1 ने चांगली कामगिरी केली आहे.
यासंदर्भात पुणे विभाग-1ने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 2019-20 या आर्थिक वर्षात पुणे विभागाने 1,80,313 पॉलिसी पूर्ण केल्या व 408 कोटी रुपयांचा प्रथम हप्ता उत्पन्न प्राप्त केले. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी पॉलिसींची संख्या 9.28 टक्क्यांनी तर प्रथम हप्ता उत्पन्नात 9.48 टक्के वाढ झाली आहे.
संगमनेर शाखेस भारतीय पातळीवर मॉडेल शाखा म्हणून गौरवण्यात आले. चिंचवड शाखेने 20,968 पॉलिसी पूर्ण करून पुणे विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला. निगडी शाखेने 17,840 पॉलिसी पूर्ण करून दुसरा क्रमांक प्राप्त केला. ही माहिती देताना पुणे विभाग 1चे वरिष्ठ मंडळ प्रबंधक बरुणकुमार खॉं, विपणन प्रबंधक अरुण कुमार नंदा, विक्री प्रबंधक महेंद्र इंगळे यांनी सांगितले की, अधिकारी आणि एजंटनी चांगली कामगिरी केल्यामुळे पुणे विभाग -1 चे काम उंचावले आहे.
सुनील पाटील, सूर्यकांत गुंडाळ, ज्ञानेश्वर डोके, प्रमोद पाटणकर, संजय चव्हाण या विकास अधिकाऱ्यांनी या उंचावलेल्या कामगिरीमध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे.