पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) 147 व्या तुकडीच्या प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीत दाखल झालेल्या जी प्रत्युष या छात्राचा प्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी मृत्यु झाला आहे. मृत्युचे कारण शोधण्यासाठी प्रबोधिनीतर्फे घटनेची चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
मूळचा बेंगळुरूचा राहणारा कॅडेट जी प्रत्युष 7 फेब्रुवारी रोजी प्रबोधिनीत दाखल झाला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 8 फेब्रुवारी रोजी तो त्याच्या खोलीत बेशुद्ध पडला होता. अनेक प्रयत्न करूनही त्याला वाचविण्यात यश आले नाही.
याबाबत प्रबोधिनीतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, मृत कॅडेटच्या पालकांना माहिती देण्यात आली आहे. तसेच घटनेचा अहवाल स्थानिक पोलीस प्राधिकरणाकडे देण्यात आला आहे. तसेच छात्राच्या मृत्युचे नेमके कारण शोधण्यासाठी शवविच्छेदनही केले जात आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश कोर्ट ऑफ इन्क्वायरीला देण्यात आले आहेत.