मुंबई : शिवभोजन केंद्रांबाबतच्या तक्रारी लक्षात घेता नियमांचे पालन न करणाऱ्या शिवभोजन केंद्रांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे. मंत्रालयातील दालनात शिवभोजन थाळी योजनेसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी त्यांनी यासंदर्भातील निर्देश दिले.
शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक शिवभोजन केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजित आहे. या कामासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदत होती मात्र प्रत्येक शिवभोजन केंद्रचालकांकडून या कामाला थोडा अवधी वाढवून मिळावा अशी मागणी होती. हे लक्षात घेता प्रत्येक शिवभोजन केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यासाठी एक महिन्याचा अवधी वाढवून देण्यात आला आहे. अशी माहिती देखील भुजबळ यांनी दिली.
शिवभोजन केंद्र चालकांना शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचा फोटो एका अँप्लिकेशनमध्ये अपलोड करण्याचा नियम आहे. मात्र या प्रणालीचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत त्यामुळे येथून पुढे हे फोटो अपलोड करण्यासाठी शिवभोजन केंद्रापासून 100 मीटर ही मर्यादा आखून दिलेली आहे. त्यामुळे शिवभोजन चालकाला 100 मीटरच्या आत म्हणजेच शिवभोजन केंद्रावर उपस्थित राहूनच फोटो अपलोड करावा लागणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून अल्पदरात म्हणजे केवळ दहा रुपयांत पोटभर जेवण उपलब्ध व्हावे या उद्देशाने शिवभोजन ही योजना 26 जानेवारी 2020 सुरू करण्यात आली आहे.